

Nanded Raju Shetti St bus Vande Bharat Express
नांदेड, पुढारी वृत्तसेवा: पुढील महिन्यापासून नांदेड-मुंबई दरम्यान धावण्यासाठी सज्ज होत असलेल्या 'वंदे भारत' रेल्वे गाडीची तारीख जाहीर होताच भाजपा नेत्यांचा हर्ष समोर आला असताना भोकर तालुक्यात पुरेसे चालक-वाहक नसल्यामुळे प्रस्तावित बससेवा सुरू होत नसल्याचे वास्तव माजी खासदार राजू शेट्टी यांनी समोर आणले आहे.
मागील काही वर्षांपासून मुंबई-जालना दरम्यान धावणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार करण्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने गेल्या महिन्यामध्ये केली होती. मंगळवारी मंत्रालयाने या रेल्वेगाडीचा २६ ऑगस्ट हा मुहर्त जाहीर केल्यानंतर भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी या घोषणेचे स्वागत करून आनंद व्यक्त केला. त्याचवेळी त्यांच्या भोकर मतदारसंघातील बससेवेसंदर्भातील एक पत्र उघड झाले.
त्यावर राजू शेट्टी यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया नोंदविली. भोकर-हस्सापूर-बेंबर हडोळी-कळगाव-कारला-पळसगाव-पळसगाव तांडा-गोरठा-उमरी या मार्गावर बससेवा सुरू होण्यासाठी शेट्टी यांनी नांदेडच्या विभाग नियंत्रकांकडे एक पत्र पाठविले होते. त्या पत्राला उत्तर देताना विभाग नियंत्रकांनी चालक-वाहकांच्या कमतरतेमुळे उपरोक्त मार्गावर बससेवा सुरू करणे शक्य नसल्याचे त्यांना कळविले.
विभाग नियंत्रकांच्या पत्राच्या अनुषंगाने शेट्टी यांनी म्हटले आहे की, 'एकीकडे बुलेट ट्रेन, वंदेभारत एक्स्प्रेस, ८६ हजार कोटींचा शक्तिपीठ मार्ग यांसारखे प्रकल्प होत असताना दुसरीकडे मात्र चालक-वाहक नसल्यामुळे एस.टी. सेवा मिळत नाही.
ही विकसित राज्याची शोकांतिका होय.' राजू शेट्टी यांनी आपली तीव्र भावना व्यक्त केल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. लाडकी बहीण योजनेत फुकट वाटायला सरकारकडे पैसा आहे, पण गरजेच्या ठिकाणी पैसा नाही आणि मनुष्यबळही नाही, असे एकाने म्हटले आहे तर सामान्य माणसांच्या अत्यावश्यक गरजांकडे सरकारचे लक्षच नसल्याचे दुसऱ्या एकाने म्हटले आहे.