

Nanded Panganga River Sahasrakund Waterfall
नांदेड, पुढारी वृत्तसेवा: मराठवाड्यात पावसाचा प्रवास निराशाजनक आहे, परंतु विदर्भात चांगलाच जोर आहे. पैनगंगेच्या लाभक्षेत्रात नियमित व दमदार पाऊस सुरू असल्याने सहस्रकुंड (ता. किनवट) येथील नयनरम्य धबधबा सहस्रधारांनी कोसळतो आहे. पर्यटक विशेषतः तरुणाईची येथे मोठी गर्दी होते आहे. रील बनवणाऱ्यांनी मात्र सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर नांदेड जिल्ह्यातील सहस्रकुंड हे नैसर्गिक धबधब्याचे ठिकाण अतिशय नयनरम्य, मनोहर आहे. पैनगंगेच्या विस्तीर्ण पात्रात तयार झालेला हा धबधबा सहस्रधारांनी को-सळतो, हे फेसाळणारे दृश्य नजरेत साठवावे तेवढे कमीच. शासनाची उदासीनता आणि दळणवळणाच्या साधनांची कमतरता यामुळे हे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय पूरक ठिकाण विकासापासून वंचित राहिले.
किलोमीटर अंतरावर असलेले सहस्रकुंड, विदर्भातील उमरखेड (जि.यवतमाळ) तालुक्यापासून मात्र जवळ आहे. सहस्रकुंड हे नांदेड-किनवट रेल्वे मार्गावरील स्थानकाचे ठिकाण, रस्ते मार्गे नदिड किनवट मार्गावर हिमायतनगर पासून अवघ्या ३२ किलोमीटर अंतरावर आहे.
पर्यटनस्थळ म्हणून सहस्रकुंड येथे खूप संधी आहेत. बुलडाणा जिल्ह्यात उगम पावणारी पैनगंगा नदी पुढे जाऊन वर्धा नदीला मिळते. या नदीचे पात्र नांदेड जिल्ह्यात प्रवेश करताना अतिशय विस्तीर्ण झाले आहे. या विस्तीर्ण अशा पात्रातच सहस्रकुंड नामक नैसर्गिकरीत्या तयार झालेला धबधबा खूपच मोहक आहे. सुमारे ४० फूट उंचीवरून फेसाळत कोसळणाऱ्या शेकडो धारा आणि त्यामुळे उडणारे थंडगार तुषार अंगावर घेणे हे स्वर्गसुखापेक्षा कमी नाही. धबधब्याचा एकसुरी आवाज कर्णमधुर भासतो.
या धबधब्याजवळच एक सुंदर बगीचा विकसित करण्यात आला आहे. फुलपाखरांचे उद्यान म्हणून त्याची ओळख अलीकडे गडद होऊ लागली आहे. पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा दूरवरून जिथे धबधब्याचे विलोभनीय दृश्य नजरेत साठविण्याची सुरक्षित व्यवस्था केली आहे, तिथूनच पाहणे योग्य. एरवी मात्र धबधब्याच्या धारांमध्ये चिंब भिजून बगिचात पहुडण्याच आनंद वेगळाच. बागेतून धबधब्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. त्यात रंगीबेरंगी फुलपाखरं थेट बालपणात आणि बालकवींच्या निसर्ग कवितांच्या विश्वात घेऊन जातात.