

Nanded Political News
नांदेड, पुढारी वृत्तसेवा नांदेड महानगर पालिकेच्या निवडणुकीत १२०३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. बुधवारी दि.३१ रोजी छाननीत अनेकांचे अर्ज वगळले गेले मात्र, शिल्लक उमेदवारां पैकी, कांही अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी प्रबळ उमेदवारांनी फिल्डिग लावली आहे. अर्ज परत घेण्यासाठी शुक्रवारी (दि. २) दुपारी तीन पर्यंतची म्हणजेच केवळ दोनच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. हे विशेष त्यामुळे अपक्षांना माघारी घेऊन आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी बरीच कसरत आता प्रबळ उमेदवारांना करावी लागणार आहे.
मनपा निवडणूक रणसंग्राम
महानगरपालिकेत २० प्रभागातून ८१ उमेदवारांना निवडून द्यायचे आहेत. छाननीत मोठ्याप्रमाणात अर्ज वगळले गेले असले तरी आणखी निवडणुकीच्या रिंगणात मोठ्याप्रमाणात उमेदवार आहेत. महायुतीत व महाविकास आघाड़ी पैकी कुणाचीही युती न झाल्याने कांग्रेस व वंचित वगळता, भाजप, शिव सेना (शिंदे गट), राष्ट्रवादी कांग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (उबाठा गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या शिवाय एमआयएम, मजपा, व इतर प्रादेशिक पक्षांनी देखील आपले उमेदवार उभे केले आहेत.
नांदेड महापालिकेच्या आजपर्यंत इतिहास पाहिला तर भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांचा कायम वरचष्मा राहिला आहे. अशोक चव्हाण यांनी याही निवडणुकीत चांगलेच लक्ष घातले असून, महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी त्यांनी चांगलीच व्यूव्हरचना तयार केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रताप पाटील चिखलीकर, शिवसेना (शिंदे गट) नेते आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर व आमदार आनंदराव बोंढारकर यांनी चांगलीच उमेदवारांची फळी उभारली आहे.
काँग्रेस व वंचितने एकत्र येत उमेदवार उभे केले आहेत. एमआयएम तसेच इतर प्रादेशिक पक्षाचे उमेदवार ही आपले नशीब आजमावत असले तरी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्याही अधिक असल्याने विजयाचे प्रबळ दावेदार असलेल्या उमेदवारांसाठी हे अपक्ष डोकेदुखी ठरणारे आहेत. शुक्रवारी उमेदवारी अर्ज वापस घ्यायचा अंतिम दिवस असून, विजयाची खात्री असलेल्या प्रबळ पक्षाच्या उमेदवारांनी अपक्षांची मनधरणी करण्यास सुरवात केली आहे. त्यांना यात कितपत यश मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तुमची अपेक्षा पूर्ण करू..
या निवडणुकीत अपक्षांची मोठी डोकेदुखी ठरत असल्याने. त्यांना अर्ज परत घेण्यासाठी नातेवाईक, मित्रमंडळी, नेत्यांकडून मनधरणी करणे तसेच साम, दाम दंड या नितीचा वापर करत शेवटी तुमची काय अपेक्षा आहे, त्याची पूर्तता तातडीने करण्याचे आश्वासन देणे व त्यांना उमेदवारी वापस घ्यायला लावणे, त्या उमेदवारांचा आपल्यालाच पाठिंबा कसा मिळेल यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज परत घ्यायचा कालावधी कमी असल्याने उमेदवाराच्या कुवतीनुसार 'लक्ष्मी दर्शन' ही घडविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समजते.