

Nanded Political News : Development of Nanded is impossible without BJP : Srijaya Chavan
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : पुढील पाच वर्षात नांदेड शहराचा सर्वांगीण विकास साधायचा आहे. येणाऱ्या काळात लाडक्या बहिणींनाही दरमहा २१०० रुपये दिले जाणार आहेत. मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन आ. श्रीजया चव्हाण यांनी केले.
भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ प्रभाग क्र. ८ गोरक्षण मारोती मंदिर, गोकुळनगर येथे झालेल्या सभेत त्या बोलत होत्या. यावेळी माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, डी.पी. सावंत, अमरनाथ राजूरकर, विजय येवनकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आ. श्रीजया चव्हाण पुढे म्हणाल्या, गोरक्षण परिसरात असलेल्या स्टेडियम भागात लवकरच विकास करण्याची संकल्पना हाती घेण्यात आली आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत आतापर्यंत ३८ जलकुंभांचे काम पूर्ण झाले आहे.
त्यामुळे नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत आहे. वाहतुकीच्या कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विशेष योजना तयार करण्यात आली असून त्याची अंमलबजावणीही लवकरच होणार आहे. शहराच्या विकासासाठी खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाची गरज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यामार्फत मोठा निधी आणून त्यामाध्यमातून शहराचा विकास करावयाचा आहे. त्यांचे हात मजबूत करण्यासाठी आपले नेते अशोक चव्हाण यांचे हात मजबूत करण्याची गरज आहे, असेही प्रतिपादन श्रीजया चव्हाण यांनी केले. यावेळी खा. अशोक चव्हाण, डी.पी. सावंत, अमरनाथ राजूरकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.