

विशेष प्रतिनिधी
नांदेड ः नांदेड येथे पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याच्या संदर्भात चार वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठविण्यात आला होता; पण काही त्रूटींमुळे त्यावरील पुढील कार्यवाही थांबली होती. आता पोलीस महासंचालक कार्यालयाच्या सूचनेवरून आयुक्तालयासंबंधी सुधारित प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या माहितीला जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी येथे दुजोरा दिला.
नांदेड शहर आणि जिल्ह्यात मागील काही आठवड्यांत अत्यंत गंभीर स्वरूपाच्या घटनांची नोंद झाली. 4 ते 6 एप्रिल दरम्यान खुनाच्या पाच घटनांमुळे संपूर्ण जिल्हा हादरला होता. खून तसेच इतर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमुळे गृहविभागाच्या कारभारावरच टीकाटिप्पणी सुरू झाली. त्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे वरील काळात नांदेडमध्ये फिरकले नाहीत. त्यामुळेही बरीच ओरड झाली; पण आता पालकमंत्र्यांच्या दौऱ्याला मुहूर्त लागला असून शनिवारी कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधितांची बैठक ठेवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर नांदेड महानगरातील कायदा व सुव्यवस्था चोखपणे राखण्यासाठी तसेच वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तालय तातडीने स्थापन करण्याची निकड निर्माण झाली आहे. भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची मुंबईत प्रत्यक्ष भेट घेऊन पोलीस आयुक्तालयाच्या प्रलंबित विषयाकडे त्यांचे लक्ष वेधले होते.
या भेटीनंतर महासंचालकांच्या कार्यालयाने नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधून आयुक्तालयासंबंधीचा सुधारित प्रस्ताव पाठविण्याची सूचना दिली होती. त्यानुसार सुधारित प्रस्ताव महासंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याचे अबिनाशकुमार यांनी शुक्रवारी येथे सांगितले.
सावे यांचे आगमन!
पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड जिल्हा दौरा गुरुवारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी सकाळी छत्रपती संभाजीनगरहून प्रयाण करत थेट जिल्ह्यातील माहूर गाठले. तेथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या. मंत्री सावे नांदेडमध्ये मुक्काम करणार असून शनिवारी सकाळी 10 वाजल्यापासून ते वेगवेगळ्या बैठका घेणार आहेत. यात प्रामुख्याने कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला जाणार आहे. बऱ्याच कालाधीनंतर पालकमंत्र्यांचे नांदेडमध्ये आगमन झाले असून समाजमाध्यमांत त्यांच्या या दौऱ्याचे वर्णन ‘वरातीमागून घोडे’ अशा शब्दांत करण्यात येत आहे.