

The police in Nanded city have now launched a decisive campaign against criminals
संतोष जोशी
नांदेड : गेल्या काही दिवसांत गैंगवार आणि पाच जणांच्या निघृण हत्येच्या घटनांनी हादरलेल्या नांदेड शहरात आता पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध निर्णायक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. शिक्षणा पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेडची प्रतिमा क्राईम कॅपिटल अशी होऊ लागल्याने, स्वतः पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार मैदानात उतरले आहेत. खाकीचा धाक निर्माण करण्यासाठी त्यांनी स्वतः दुचाकीवरून रात्र गस्त (पेट्रोलिंग) सुरू केली असून, पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी २५ सराईत गुन्हेगारांची रस्त्यावरून धिंड काढल्याने गुंडांचे धाबे दणाणले आहेत.
नांदेड शहरात बंदुक तलवारी, खंजरसारखा सापडत असलेला घातक शस्त्रसाठा आणि गुन्हेगारी टोळ्यांचे वाढते वर्चस्व पाहता, सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. याची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी जिल्ह्यात कोम्बिंग ऑपरेशनचे आदेश दिले.
विशेष म्हणजे, अधीक्षकांनी केवळ आदेश न देता स्वतः मध्यरात्री जुना नांदेड, देगलूर नाका, जुना मोंढा आणि पीरबु-हाण नगर यांसारख्या संवेदनशील भागात दुचाकीवर फिरून बंदोबस्ताची पाहणी केली. वरिष्ठ अधिकारीच रस्त्यावर उतरल्याने सुस्तावलेली गस्त यंत्रणाही सतर्क झाली आहे.
नांदेड ग्रामीणचे पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी आक्रमक पवित्रा घेत, शहरातील सुमारे २५ सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले. नागरिकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी या गुन्हेगारांची ५ किलोमीटरपर्यंत शहराच्या मुख्य रस्त्यांवरून धिंड काढण्यात आली. पोलिसांच्या या अॅक्शनमुळे शहरात "कायदा मोठा की गुंड?" या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
गेल्या पाच दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या कोम्बिंग ऑपरेशन व धडक मोहिमेत मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. गंगवारची मालिका सध्या थांबली असली तरी, भविष्यात अशा घटना घडू नयेत, गुन्हेगारांवर खाकीचा वचक रहावा यासाठी ही मोहीम दीर्घकाळ सुरू ठेवण्याची मागणी नागरिक करत आहेत.