Dhule Crime | खाजगी ॲपवर गाडी बुक करून कारचालकाची लूट करणाऱ्या दोघांना अटक!

अटक केलेले दोघे आरोपी मुंबईचे : पोलिसांच्या डायल ११२ प्रणालीवर कॉल आल्याने तातडीने ॲक्शन
Dhule Crime
Dhule Crime
Published on
Updated on

धुळे : प्रवासी वाहतुकीची सेवा देणाऱ्या खाजगी ॲपच्या वापर करून कार चालकाची लूट करणाऱ्या दोघांच्या मुसक्या नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी आवळल्या आहे. अटक केलेले दोघे मुंबईचे राहणारे असून त्यांनी भोपाळ येथे जाण्यासाठी ॲपवरून कारची बुकींग करून धुळे जिल्ह्यात मुंबई आग्रा महामार्गावर कार चालकाला बेदम मारहाण करून त्याची गाडी हिसकवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या 112 नंबर वर आलेल्या कॉलच्या माध्यमातून तातडीने हालचाली झाल्याने लूट करण्याचा चोरट्यांचा हा प्रयत्न फसला.

सध्या खाजगी कार चालकांच्या माध्यमातून एक ॲप चालवले जाते आहे. या ॲपवर नोंदणी केल्यानंतर प्रवाशांना इच्छित ठिकाणी जाण्यासाठीची सेवा उपलब्ध करून दिले जाते. मात्र ही सोय चोरट्यांनी त्यांच्या सोयीनुसार वापरल्याचे चित्र दिसून आले आहे. असाच प्रकार मुंबई आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यातील नरडाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.

पोलिसांच्या डायल ११२ प्रणालीवर नरडाणा येथे राहणारे राहुल सपकाळ यांनी कॉल करुन कळविले की, एक लाल रंगाची वोक्सवॅगन पोलो कार नं. एम.पी.०४/सी.व्ही. ३०८४ मध्ये एका व्यक्तीला ३ लोकं मारत असल्याने मदत पाहीजे. याबाबत कळविल्याने तात्काळ डायल ११२ चे पोलीस अंमलदार पोहेकों योगेश गिते, अजय सोनवणे हे शासकीय वाहनाने मुंबई आग्रा महामार्ग क्र.३ वर नरडाणा गावापासून काही अंतरावर घटनास्थळी पोहचले असता मारहाण करणारे तीन लोक अंधाराचा फायदा घेवून पळून गेले.

त्यानंतर लाल रंगाची वोक्सवॅगन पोलो कार नं.एम.पी. ०४ सी.व्ही.३०८४ मध्ये असलेल्या इसमास त्याचे नांवगांव विचारता त्याने त्याचे नाव तनुष राजेश तोमर असे सांगितले. तोमर हे मूळ भोपाळ येथील रहिवासी असून सध्या ते मुंबई येथे राहत असल्याची माहिती त्यांनी सांगितली. लुटीच्या घटनेविषयी माहिती देताना तोमर यांनी सांगितले की एका महिन्यापूर्वी त्यांना भोपाळ येथे जायचे असल्याने त्यांनी एका खाजगी ॲपवर ही माहिती नोंदवली. त्यानुसार राजू आणि त्याच्या दोन साथीदारांना नाशिक येथील औरंगाबाद नाका येथून पिकअप करून तोमर हे भोपाळ येथे जाण्यासाठी निघाले. मात्र ही कार धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावर नरडाणा परिसरात आल्यानंतर एका व्यक्तीने त्याला उलटी होत असल्याचे नाटक करून कार थांबवण्यास भाग पाडले. यानंतर कार थांबताच तिघांनी तोमर यांच्या तोंडावर मिरचीचा स्प्रे मारून त्यांना बेदम मारहाण करून कारची चावी मागितली. मात्र तोमर यांनी कारची चावी खिडकीतून बाहेर फेकून दिली. मात्र चोरट्यांनी त्यांच्या खिशातील रोकड आणि अन्य ऐवज काढून घेतला. याच दरम्यान पोलीस पथक घटनास्थळी पोहोचल्याने अंधाराचा फायदा घेऊन तिघेही चोरटे पळून गेले. या घटने संदर्भात नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान नरडाणा पोलिसांनी शोध मोहीम राबवली. यावेळी नरडाणा परिसरातील विश्रामगृहाच्या मागील बाजूस त्यांना दोन संशयित आढळून आले. या संशयीतांना पाठलाग करून पोलीस पथकाने ताब्यात घेतले. यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणले असता तोमर यांनी या दोघांना ओळखले .या दोघांसमवेत असणाऱ्या आणखी एकाने रोकडची लूट करून मारहाण केल्याचे देखील स्पष्ट झाले. या दोघेही चोरट्यांची प्राथमिक चौकशी केली असता ते दोघेही मुंबईचे रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांची नावे गजानन शिवकुमार शर्मा ,अभिनव पप्पु शर्मा असल्याचे निष्पन्न झाले आहे तर आता तिसऱ्या चोरट्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे सतर्कतेचे आवाहन

या घटनेतून गुन्हेगारांनी वापरलेली एक नवीन पद्धत समोर आली आहे. ब्ला-ब्ला-कारसारख्या अ‍ॅपचा वापर करून वेगवेगळ्या नावाने बुकिंग करून चालकांना निर्जन ठिकाणी लक्ष्य केले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रवासादरम्यान अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news