

Wild Animals Spotted Painganga
उमरखेड : बुद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर १ व २ मे रोजी पैनगंगा अभयारण्यात वन विभागाच्या वतीने वन्यप्राणी गणना मोहीम राबविण्यात आली. या दोन दिवसीय मोहिमेत वनअधिकारी, कर्मचारी, वन्यजीव अभ्यासक व निसर्गप्रेमींनी सहभाग घेत विविध वन्यप्राणी व पक्ष्यांच्या हालचालींची नोंद केली.
गणनेदरम्यान पैनगंगा अभयारण्य परिसरात एक वाघ, तीन सांबर, तीन रानडुक्कर, पाच रोही, एक मोर तसेच बारा रानडुकरांचे दर्शन झाल्याची माहिती समोर आली. याशिवाय अस्वलाच्या पावलांचे ठसेही आढळून आले. रात्रीच्या निरीक्षणात नाईट जार व घुबडांच्या आवाजांची नोंद करण्यात आली.
पक्षी निरीक्षणामध्ये यलो लेग ग्रीन पिजन, व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर, ब्लॅक ड्रोंगो, व्हाईट बेलीड ड्रोंगो, मॅग्पाय रॉबिन, ब्ल्यू जे, रुफस ट्रीपाई, ग्रे हॉर्नबिल, मराठा वुडपेकर तसेच गोल्डन बॅक वुडपेकर या विविध पक्ष्यांचे निरीक्षण करण्यात आले.
वन्यजीव गणनेमुळे जंगलातील जैवविविधतेचा अभ्यास, प्राण्यांची संख्या, त्यांच्या अधिवासाची स्थिती तसेच संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्यास मदत होत असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. बुद्ध पौर्णिमेच्या काळात जलस्त्रोतांवर प्राण्यांची वर्दळ वाढत असल्याने या काळातील गणना अधिक महत्त्वपूर्ण मानली जाते.
या मोहिमेमुळे पैनगंगा व टिपेश्वर अभयारण्यातील वन्यजीव संपदेचे वैभव पुन्हा अधोरेखित झाले असून, परिसरातील पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृतीसही चालना मिळत आहे.