

Painganga Wildlife Sanctuary Nanded
प्रशांत भागवत
उमरखेड : हिवाळ्याची चाहूल लागताच राज्यातील विविध संरक्षित अभयारण्यांमध्ये जंगल सफारीला सुरुवात झाली आहे. विदर्भ–मराठवाड्याच्या सीमेवरील पैनगंगा अभयारण्यातही सफारीचा श्रीगणेशा झाला आहे. विशेष म्हणजे बुधवारी झालेल्या पहिल्याच जंगल सफारीत पर्यटकांना वाघाचे थेट दर्शन घडल्याने आनंदाला उधाण आले.
तेलंगणातून आलेल्या पर्यटकांच्या वाहनासमोर पैनगंगा अभयारण्यात वास्तव्यास असलेल्या एकमेव पट्टेदार वाघ ‘जॉनी’ने अचानक दर्शन दिले. एवढेच नव्हे, तर काही क्षण थांबून छायाचित्रांसाठी जणू सुंदर पोज दिल्याने पर्यटकांनी हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला. पहिल्याच सफारीत वाघदर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
अलीकडच्या काळात पैनगंगा अभयारण्यात वाघाचे एक जोडपे वास्तव्यास आले होते. वनविभाग व पर्यटकांनी त्यांना ‘जॉनी’ आणि ‘इंदु’ अशी नावे दिली होती. काही काळ दोघांचा मुक्त संचार पाहायला मिळत होता. मात्र एके दिवशी इंदु अचानक जॉनीला सोडून निघून गेली आणि ती कायमचीच परतली नाही. तरीही जॉनी आजही अभयारण्यातच भ्रमंती करत असून, इंदु कधीतरी परत येईल, या आशेने जणू जंगलातच थांबला आहे, असे चित्र पर्यटकांना पाहायला मिळते.
हिवाळ्याच्या काळात जंगल सफारीसाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्याने पैनगंगा अभयारण्यात पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सोमवारपासून अधिकृत जंगल सफारीला सुरुवात होणार असून, निसर्गप्रेमी व पर्यटकांनी या संधीचा लाभ घेऊन वन्यप्राणी दर्शनाचा पुरेपूर आनंद घ्यावा, असे आवाहन पैनगंगा अभयारण्य व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.
पहिल्याच सफारीत वाघदर्शनाचा योग आल्याने पैनगंगा अभयारण्याची ओढ आता पर्यटकांमध्ये अधिकच वाढणार, हे निश्चित आहे.