Painganga Sanctuary Road Issue | ‘आमदारा, आम्हाला रस्ता द्या!’; पैनगंगा जंगलवासीयांचा वेदनादायी आवाज कवितेतून घुमला

पैनगंगा अभयारण्य परिसरातील मोरचंडी, गाडीबोरी, थेरडीसह अनेक दुर्गम गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था आजही कायम
Painganga Wildlife Sanctuary Road Repair Issue
Painganga Wildlife Sanctuary Road Repair IssuePudhari
Published on
Updated on

Painganga Wildlife Sanctuary Road Repair Issue

प्रशांत भागवत

उमरखेड : पैनगंगा अभयारण्य परिसरातील मोरचंडी, गाडीबोरी, थेरडीसह अनेक दुर्गम गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था आजही कायम असून, पावसाळ्यात चिखल, खड्डे आणि ओढ्यांमुळे अनेक गावांचा बाह्यजगाशी संपर्क तुटतो. परिणामी आजारी रुग्ण, गर्भवती महिला, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. या विदारक वास्तवाला शब्दबद्ध करत मोरचंडी येथील लोकशाहीर हनवता मुकाडे यांनी आपल्या बोलीभाषेतील कवितेतून जंगलवासीयांच्या वेदना प्रभावीपणे मांडल्या आहेत.

"शेवटचं सांगणं रे आमदारा... एकच साठी आमचं मागणं रे, रस्त्यासाठीच रे आमदारा..." अशा आर्त सादेने सुरू होणारी ही कविता थेट लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारते. "आम्ही जंगलात राहतो म्हणून आमची किंमत नाही का?", "पावसाळ्यात रस्ते वाहून जातात", "आजारी माणसाला वेळेत दवाखान्यात नेता येत नाही" अशा ओळींमधून दुर्गम भागातील नागरिकांच्या दैनंदिन संघर्षाचे वास्तव जिवंतपणे उभे केले आहे.

Painganga Wildlife Sanctuary Road Repair Issue
Nanded Police Inspector Transfer|पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांची तडकाफडकी बदली रद्द करा, धर्माबाद ठाण्यात आंदोलन

या कवितेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे, शेतमाल बाजारपेठेत पोहोचविण्याच्या समस्या, रुग्णांना खाटेवर किंवा खांद्यावरून वाहून नेण्याची वेळ तसेच निवडणुकांच्या काळात दिल्या जाणाऱ्या आश्वासनांवरही भाष्य करण्यात आले आहे. "मत मागायला येता, पण रस्ता मात्र होत नाही," असा थेट सवाल शाहीरांनी लोकप्रतिनिधींना केला आहे.

ही कविता केवळ साहित्यकृती नसून पैनगंगा अभयारण्यातील जंगलवासीयांच्या मूलभूत प्रश्नांचा आवाज बनली आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी भावना कवितेतून व्यक्त झाली आहे.

Painganga Wildlife Sanctuary Road Repair Issue
Nanded Bidar rail project : नांदेड बिदर रेल्वेमार्ग : एक चव्हाण सक्रिय; तर दुसरे निष्क्रिय?

पैनगंगा अभयारण्यातील गावांचा विकास केवळ घोषणांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्षात व्हावा, जंगलवासीयांना सर्व ऋतूंमध्ये सुरक्षित आणि वाहतुकीयोग्य रस्त्यांचा मूलभूत हक्क मिळावा, अशी अपेक्षा या कवितेतून व्यक्त करण्यात आली आहे. आता या आर्त हाकेला प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कितपत प्रतिसाद देतात, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news