Nanded Bidar rail project : नांदेड बिदर रेल्वेमार्ग : एक चव्हाण सक्रिय; तर दुसरे निष्क्रिय?

नांदेड जिल्हा रेल्वे परिषदेकडून काँग्रेस खासदारांचा निषेध
Nanded Bidar rail project
अशोक चव्हाण आणि रवीन्द्र चव्हाण.pudhari photo
Published on
Updated on

संजीव कुळकर्णी

नांदेड – रेल्वेमंत्र्यांसह अन्य केंद्रीय मंत्र्यांना भेटून नांदेड आणि मराठवाड्याशी संबंधित मागण्या पुढे रेटण्याच्या विषयात भाजपाच्या दोन राज्यसभा सदस्यांमध्ये चढाओढ लागलेली असताना, नांदेडचे लोकसभेचे खासदार राजधानी दिल्लीमध्ये नेमके काय करत आहेत, असा प्रश्न येथे उपस्थित झाला आहे. नांदेड जिल्हा रेल्वे परिषदेने तर काँग्रेस खासदारांच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदवला आहे.

नांदेड जिल्ह्याला सध्या ५ खासदारांचे पाठबळ लाभले आहे. लोकसभेतील ३ आणि राज्यसभेचे दोन अशी त्यांची विभागणी असून या पाच जणांत अशोक चव्हाण आणि डॅा. अजित गोपछडे हे सत्ताधारी भाजपा खासदार मंत्र्यांकडे जाऊन त्यांना निवेदन देणे, चर्चा करणे आणि त्याची प्रसिद्धी या बाबतीत आघाडीवर असले, तरी गेल्या दीड – दोन वर्षांत नांदेड जिल्ह्याच्या पदरात काहीच पडले नाही.

Nanded Bidar rail project
Beed News : आरसुळे वस्तीच्या पुलाचा प्रश्न लागणार मार्गी

नांदेड – बिदर रेल्वेमार्गाचे घोंगडे गेली अनेक वर्षे भिजत पडले आहे. या विषयात महाराष्ट्र सरकारने आपले दायित्व पूर्वीच स्वीकारले; पण कर्नाटक सरकारने खर्चामध्ये वाटा उचलण्यास नकार दिला असल्यामुळे वरील प्रकल्प अडकून पडला असल्याचे मध्यंतरी निदर्शनास आले होते.

या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात खा. चव्हाण यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी वरील विषयावर दिल्लीमध्ये चर्चा झाली. चव्हाण यांनी नंतर त्यांना तातडीने पत्र पाठवून आवश्यक ती विनंती केल्याची माहिती समोर आली. तसेच खा. चव्हाण यांनी नांदेड – बिदर रेल्वेमार्ग कशामुळे रखडला आहे, हे त्या राज्याचे प्रमुख नेते या नात्याने खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनाही सांगितले.

वरील माहिती बाहेर आल्यावरच, नांदेड – बिदर रेल्वेमार्गाच्या विषयात नांदेडचे खासदार प्रा. रवीन्द्र चव्हाण नेमके काय करत आहेत, असा प्रश्न जिल्ह्यात निर्माण झाला. हा विषय मार्गी लावण्याच्या बाबतीत त्यांना चांगली संधी आहे. कर्नाटक राज्यात काँग्रेसचे सरकार असल्यामुळे दिल्लीतील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून संमती मिळविणे. आवाक्यामध्ये असतानाही खा. रवींद्र चव्हाण यांनी वरील विषयात पुढाकार घेतल्याचे दिसून आलेले नाही.

काही महिन्यांपूर्वी कर्नाटकातील भाजपाचे एक नेते नांदेडमध्ये आले होते. ते खा. अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी आले असता, नांदेड – बिदर रेल्वे मार्गाच्या कामाचा विषय निघाला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात भाजपाच्या चव्हाण यांनी हा विषय त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितल्यानंतर आता नांदेडमधील काँग्रेसच्या चव्हाण यांना जागे करण्याचा प्रसंग आला आहे.

महाराष्ट्रात वर्धा – यवतमाळ – नांदेड रेल्वेमार्गाचे प्रगतिपथावर असून त्यासोबत बिदरपर्यंतचा रेल्वेमार्ग पूर्ण झाला, तर उत्तर आणि दक्षिण भारतास जोडणारा एक नवा – प्रशस्त रेल्वेमार्ग होऊ शकतो, ही बाब १५-२० वर्षांपूर्वी निदर्शनास आणून देण्यात आली;पण २०२६ साल सरत आले, तरी एका टप्प्यावर वरील काम ठप्पच आहे.

Nanded Bidar rail project
Manikrao Kokate : सदनिका गैरव्यवहार प्रकरण : माणिकराव कोकाटेंना सर्वोच्‍च न्‍यायालयाचा दिलासा नाहीच

प्रस्तावित रेल्वेमार्ग खा. रवींद्र चव्हाण यांच्या लोकसभा क्षेत्रातील प्रमुख गावांमधून (त्यात नायगावही आहे.) जाणार आहे. ही बाब लक्षात घेता त्यांनी पुढाकार घेणे अपेक्षित होते. पण ह्या तसेच रेल्वेविषयक मागण्यांतील त्यांचे औदासिन्य दिसून येते, असे संबंधितांत बोलले जात आहे.

खासदारांची निष्क्रियता निषेधार्ह - नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे नांदेड-देगलूर-बिदर या रेल्वेमार्गाच्या कामासाठी रेल्वे परिषदेने सातत्याने पाठपुरावा केला. परंतु, मागील दीड-दोन वर्षांत खासदारांनी कर्नाटक मुख्यमंत्र्यांकडे ना काँग्रेस पक्षाध्यक्षांकडे हा विषय मांडला. वास्तविक पाहता हा प्रकल्प आता फक्त कर्नाटक सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. कर्नाटकात काँग्रेस पक्षाचे सरकार आहे व रवींद्र चव्हाण हेही काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत. त्‍यामुळे आता त्यांनी आपले राजकीय कस पणाला लावून हा प्रश्न मार्गी लावणे अपेक्षित आहे. परंतु, दुर्दैवाने तसे काही झालेले नाही. या रेल्वे मार्गापैकी मोठा भाग हा खासदारांच्या मतदारसंघातून व त्यांच्या स्वतःच्या गावावरून जातो. असे असतानाही खासदार या प्रश्नाकडे लक्ष का देत नाहीत? हा आमच्या समोरचा मोठा प्रश्न आहे.

शंतनु डोईफोडे, नांदेड जिल्हा रेल्वे परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news