Nanded Politics : नांदेड जिल्ह्यात कर्णधाराविना ११ आमदारांचा चमू!

भाजपा व अन्य पक्षांनी जिल्ह्याला मंत्रिपदापासून वंचित ठेवले आहे.
Nanded Politics
Nanded Politicspudhari photo
Published on
Updated on

विशेष प्रतिनिधी

नांदेड : विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची सुमारे चार वर्षांपासून रिक्त असलेली जागा भरली गेल्यामुळे नांदेड जिल्ह्यात महायुतीच्या आमदारांची संख्या ११ झाली आहे; पण अकरा जणांच्या क्रिकेट संघासाठी जसा कर्णधार असतो, तसा जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांच्या चमूला कोणीही ‘कर्णधार’ नाही. भाजपा व अन्य पक्षांनी या जिल्ह्याला मंत्रिपदापासून वंचित ठेवले आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाच्या अमरनाथ राजूरकर यांचा सोमवारी विजय झाल्यानंतर धावत्या संवादात त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले. ते परिषदेवर तिसर्‍यांदा निवडून गेल्यामुळे मंत्रिपदाच्या अपेक्षेबद्दल त्यांना विचारले गेले; पण कुठलीही अपेक्षा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Nanded Politics
Nanded MLC Election Result : काँग्रेसने राखलेल्या 'कुळा'वर भाजपाचा प्रथमच ताबा !

जिल्ह्यामध्ये मागील म्हणजे काँग्रेसच्या सत्ताकाळात श्यामराव कदम, बाजीराव शिंदे, अशोक चव्हाण या विधान परिषद सदस्यांनी वेगवेगळ्या मंत्रिमंडळांमध्ये राज्यमंत्रीपद भूषविले. पण चव्हाण यांच्यांनतर जिल्ह्यातील एकही विधान परिषद सदस्य मंत्री झाला नाही.

राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील पहिले सरकार २०१४ साली स्थापन झाले. तेव्हा जिल्ह्यात भाजपा-शिवसेनेचे ५ विधानसभा सदस्य होते, तरी देवेन्द्र फडणवीस किंवा तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुखांनी नांदेडमधून कोणालाही मंत्री किंवा राज्यमंत्री केले नाही. त्यानंतर २०१९मध्ये राज्यात अनपेक्षितपणे महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा अशोक चव्हाण यांच्या रूपाने जिल्ह्याला मंत्री लाभला. हे सरकार २०२२मध्ये कोसळल्यांनतर मागील चार वर्षांपासून जिल्ह्याला मंत्रिपदाचा ‘लाल दिवा’ नाही.

२०२४च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ९ जागांपैकी ५ जागा भाजपा, ३ शिवसेना आणि १ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली. महायुतीला शत-प्रतिशत यश मिळाले; पण भाजपाने अनुभवी भीमराव केराम यांना तर ‘राष्ट्रवादी’ने प्रताप पाटील चिखलीकर यांना मंत्रिमंडळामध्ये संधी दिली नाही.

शिवसेनेने आपल्या तीन विधानसभा सदस्यांच्या जोडीला माजी खासदार हेमंत पाटील यांना विधान परिषदेवर घेतले. त्यात आता भाजपाकडून राजूरकर यांची भर पडल्यानंतर जिल्ह्यातील आमदारांची संख्या ११ झाली आहे.

२००९ साली जिल्ह्यात सर्व आमदार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकवटले होते. त्यात नंतर राजूरकरांची भर पडल्यामुळे सत्ताधारी आमदारांची संख्या १० झाली. तो एक विक्रम होता. आता महायुतीने त्यास मागे टाकत जिल्ह्यात आपल्या आमदारांची संख्या ११ केली आहे. जिल्ह्यात सत्ताधारी पक्षांशी संबंधित आतापर्यंत २ खासदार होते. त्यांत आता नागेश पाटील आष्टीकर यांची भर झाली आहे.

Nanded Politics
Nanded Legislative Council election : भाजपातर्फे अमरनाथ राजूरकर यांचे नाव फायनल?

माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांनी आ.चिखलीकर यांना पुढील काळात मंत्रिमंडळात स्थान देण्याचा शब्द आपल्या अखेरच्या नांदेड दौर्‍यामध्ये दिला होता; पण त्यांच्या अकाली निधनामुळे चिखलीकरांना हवेहवेसे वाटणारे मंत्रीपद अनिश्चिततेच्या फेर्‍यात अडकले आहे.

राठोड अजूनही आमदार...

भीमराव केराम आणि डॉ.तुषार राठोड यांच्या आमदारकीची ही तिसरी कारकीर्द आहे. एक जण आदिवासी तर दुसरा ओबीसी; पण पक्षनेतृत्वाने त्यांना झुलवत ठेवले आहे. डॉ.राठोड यांना तुम्ही आमदार करा; मी त्यांना नामदार करतो, असे खुद्द मुख्यमंत्र्यांनी मुखेडला जाहीर केले होते, तरी राठोड अद्यापही आमदारच आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news