Nanded Now fighting malaria, dengue, typhoid
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : पाऊस आणि पूर परिस्थितीला यशस्वी तोंड दिल्यानंतर आता संकट उभे राहते आहे, ते साथीच्या रोगांचे. सर्वत्र दमट व ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. घराघरातील गच्च्यांवर कुठे ना कुठे पावसाचे पाणी साचले आहे. घराच्या परिसरात डबकी निर्माण झालेली आहेत. यामुळे डासांची प्रचंड पैदास होत असून डेंग्यू, मलेरिया आणि टायफाईटचे रुग्ण वाढत चालले आहेत. यावर जनजागृती हा सर्वाधिक परिणामकारक उपाय असल्याचे ज्येष्ठ फिजीशियन डॉ. साहेबराव मोरे यांनी सांगितले.
ऑगस्ट महिन्यात दोन वेळा पावसाचा जबरदस्त तडाखा नांदेकरांना बसला. नांदेड तालुक्याला तर या हंगामात वारंवार संततधार व अतिवृष्टीने झोडपले. त्यामुळे परिसरात पिकणारा भाजीपाला व फुलांचे प्रचंड नुकसान झाले. शहराच्या अंतर्गत भागात सुद्धा सिमेट काँक्रीटचे रस्ते झाले आहेत. त्यामुळे पाणी मुरायला जागा नाही, परंतु पडणाऱ्या पावसाच वेग मात्र वाढला आहे. बरेचसे पाणी खोलगट भागात साचून राहते. याशिवाय घराच्या अंगणात किंवा गच्चीवर फुटके डबे, टोपले, साचलेले पाणी यावर रोग पसरविणाऱ्या डासांच्या मादी ३ दिवसांत अंडी घालतात. यामुळे डासांची प्रचंड पैदास झाली आहे.
वास्तविक आता प्रत्येक कुटुंबाने आपापले घर, गच्ची यावर साचलेले पाणी अगोदर काढून टाकले पाहिजे. स्था.स्व. संस्थांच्या यंत्रणेने साचलेल्या पाण्यावर फवारणी करावी, मोठ्या प्रमाणावर साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडले पाहिजेत. नांदैड शहरात प्रामुख्याने रिकाम्या प्लॉटमध्ये सतत पाणी साचलेले असते. अशीच ठिकाणं रोगांची आगार असतात. सद्या स्थितीत नांदेड जिल्ह्यात टायफाईड वा डेंग्युचे रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत. मलेरियाचे प्रमाण सुद्धा खूप आहे. व्हायरलच्या माध्यमातून या आजारांचा प्रसार होतो. त्यामुळे जनजागरण मोठ्या प्रमाणात होण्याची गरज डॉक्टर व्यक्त करीत आहेत.
पूर्वी ग्रामीण भागातून पावसाळ्याच्या दिवसात कॉलरा हा आजार प्रचंड प्रमाणात होता. पाण्याचे जे स्त्रोत असत, त्यात पावसाचे वाहून आ-लेले पाणी मिसळले जात असे. शिवाय उघड्यावर पाणंदी असल्याने ती घाण सुद्धा पावसाच्या पाण्याबरोबर वाहात असे. परंतु आता स्वच्छ भारत अभियानात बऱ्यापैकी उगड्यावरील घाण बंद झाली आहे. त्यामुळे कॉलरासारखे आजार नामशेष झाल्याची प्रतिक्रिया डॉ. साहेबराव मोरे यांनी व्यक्त केली.