Unnatural act committed on a 13-year-old minor boy in a hostel in Lakhmapur
श्रीक्षेत्र माहूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील लखमापूर येथील एका वसतिगृहात एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलावर त्याच्याच वसतिगृहातील एका अल्पवयीन विद्यार्थ्याने अन्य तीन विद्यार्थ्यांच्या मदतीने अनैसर्गिक कृत्य करून त्याचा व्हिडीओ काढल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. सदर प्रकरणी चौघा विधी संघर्षित बालकांवर माहूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित विद्यार्थ्यांच्या वडिलांनी दि. ३० ऑगस्ट रोजी माहूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीत इयत्ता ५ वीत शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या मुलास दोघांनी पकडले आणि एका अल्पवयीन विद्यार्थ्याने अनैसर्गिक कृत्य केले, आणि एकाने त्याचा व्हिडिओ बनविला. तसेच कुणाला सांगितले तर जीवानिशी खतम करून टाकीन अशी धमकी सुद्धा दिली, असे म्हटले आहे. गावात प्रसारित झालेला व्हिडिओ पाहून वडिलाने माहूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
माहूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघा विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. पो. नि. गणेश कराड यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. शरद घोडके हे पुढील तपास करीत आहेत. या घटनेने वसतिगृहात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे बिंग फुटले असून पालकवर्गात घबराहटीचे वातावरण पसरले आहे.