

Newspaper Vendor Killed in Jalna
नांदेड : जालना बसस्थानक परिसरातील अनोळखी व्यक्तीच्या खून प्रकरणातील मृताची ओळख पटवून एका मारेकऱ्याला जेरबंद करण्यात जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या मृताची ओळख पटली असून तो नांदेडमधील वृत्तपत्र विक्रेता रामेश्वर दत्तराव पवार असल्याचे समोर आले आहे. राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार नांदेड यांचे ते लहान बंधू होत. त्यांच्या पार्थिवावर आज (दि. १३) सकाळी गोवर्धनघाट स्मशानभूमी नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
नांदेडमधील तरोडा मार्गावरील लक्ष्मीनारायणनगरातील रहिवासी तथा वृत्तपत्र विक्रेता रामेश्वर उर्फ बाळा दत्तराव पवार (वय ३१) हे सोमवारी (दि. ९) सायंकाळपासून घरातून निघून गेले होते. त्यामुळे पवार कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. गुरुवारी (दि. १२) दुपारी जालन्याहून पोलिसांचा फोन पवार कुटुंबाला आला आणि त्यांनी आपल्या कुटुंबातील कुणी बेपत्ता आहे का? अशी विचारणा करुन जालन्यात यावे, असा निरोप दिला. त्यानुसार नांदेडहून वृत्तपत्र वितरक बालाजी पवार व कुटुंबीय जालन्याला गेले असता त्यांनी तेथील मृताची ओळख पटविली असता तो रामेश्वर उर्फ बाळा असल्याचे दिसून आले. त्यामुळे पवार कुटुंब हादरले. रामेश्वरचा मृतदेह घेवून आज (दि. १३) सकाळी पवार कुटुंबीय नांदेडला परतले.
तरोडा मार्गावरील लक्ष्मीनारायणनगरातील निवासस्थानी रामेश्वर यांचे पार्थिव आणण्यात आले. नंतर राहत्या घरुन सकाळी ९ वाजता अंत्ययात्रा निघाली. गोवर्धनघाट शांतीधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी विद्या रामेश्वर पवार, मुलगा विराज व मुलगी रितीका आहे. रामेश्वर यांना पाच बंधू व एक बहिण असा परिवार आहे.
या खळबळजनक घटनेबाबत जालना पोलिस दलाने प्रसिध्दीपत्रक जारी केले आहे. या पत्रकात पोलिसांनी नमूद केले की, दि. १० जून रोजी मृत अनोळखी पुरुषास अज्ञात आरोपीने गळा आवळून तसेच त्याचे डोक्याचे पाठीमागील बाजूस काहीतरी वस्तुने मारुन त्यास जखमी करुन जीवानिशी ठार केल्याचे निदर्शनास आले. याबाबत जालन्यातील सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलीस संतोष जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दि.१० जून रोजी सदर बाजार पोलिस ठाणे जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जालन्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना तपासाच्या सुचना केल्या होत्या. तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात आरोपीची ओळख पटवली. मारेकऱ्याचे नाव आबासाहेब विठ्ठलराव घोडके (वय ५८, रा.भवानीनगर, जालना) असे असल्याने त्यास त्याच्या राहत्या घरातून पथकाने ताब्यात घेवून चौकशी केली. त्याने या गुन्हयातील सहभागाची कबुली दिली. तसेच मृत रामेश्वरकडील मोबाईल व पैसे आपण चोरण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने प्रतिकार केल्याने आपण त्याचा गळा आवळून व लाकडाने मारुन खून केला, अशी कबुलीही आरोपी घोडकेने दिली.
मृताची ओळख पटविली असता रामेश्वर दत्तराव पवार (वय ३१, रा. गट नं.०२, तरोडा ब्रद्रुक, हनुमान मंदिर पाठीमागे, लक्ष्मीनारायणनगर, नांदेड) असे असल्याची माहिती मिळाली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रामप्रसाद पव्हरे, संभाजी तनपुरे, प्रभाकर वाघ, गोपाल गोशिक, कैलास खार्डे, जगदीश बावणे, दीपक घुगे, सागर बावीस्कर, ईशाद पटेल, संदीप चिंचोले, रमेश काळे, किशोर पुंगळे, योगेश सहाणे, सोपान क्षीरसागर, चालक सौरभ मुळे, अशोक जाधवर, सायबर पोलिस ठाण्याचे संदीप मांटे यांनी केली.