

Santosh Ladda robbery case Amol Khotkar gold
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
बजाजनगर येथील उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यातील दरोडाप्रकरणी एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेला मुख्य आरोपी अमोल खोतकरने साडेपाच किलो सोन्यापैकी काही साथीदारांना देऊन उर्वरित सोन्याची नांदेड, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश येथे विल्हेवाट लावल्याचा पोलिसांना संशय आहे.
दरोड्यानंतर खोतकर, सुरेश गंगणे आणि खुशी हे नांदेडमार्गे तिरुपती येथे गेले होते. नांदेड येथे आरोपी रूपेश पत्रे मार्फत सराफा मैड याला प्रत्येकी ९०० ग्रॅम वजनाची दोन चांदीची ताट आणि काही दागिने दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र आरोपींनी केवळ चांदीच असल्याची कबुली दिली आहे. पत्रे आणि मैड दोघांना न्यायालयाने गुरुवारी (दि.१२) एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (दि.१०) नांदेड येथून मृत दरोडेखोर अमोल खोतकरचा मित्र रूपेश सुभाष पत्रे - (२५) आणि सराफा व्यावसायिक वैभव - श्रीपाद मैड (२४, दोघेही रा. नांदेड) यांना अटक केली होती. रूपेशने खोतकरकडून घेतलेले चांदीचे दोन ताट सराफा मैड याला विक्री करून पैसे घेतले. खोतकरची बंगाली मैत्रीण खुशी नेही नांदेड येथे गेल्याचे सांगून पत्रे आणि मैड या दोघांना सोने आणि चांदी दिल्याचे पोलिसांना जबाब दिला आहे.
मात्र पोलिसांनी अद्याप चांदीचे ताट हस्तगत केलेले नाही. खोतकरकडून सोने चांदी घेऊन तेलंगणा, आंध्रप्रदेश येथे विक्री केल्याची शक्यता पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी न्यायालयात व्यक्त केली. परराज्यात तपासासाठी जायचे असल्याने सरकारी वकील सुधीर बनसोडे यांनी आरोपींच्या सात दिवसांची पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने एक दिवसाची कोठडी मंजूर केली.
दरोड्यात लुटून नेलेले साडेपाच किलो सोन्यापैकी केवळ ६० तोळे सोनेच पोलिसांच्या हाती लागले आहे. एक एक करून २७ दिवसांत पोलिसांनी १९ आरोपींना अटक केली. ३२ किलो चांदी, ८ लाखांची रोकड, दोन कार, मोपेड जप्त केली आहे. उर्वरित सोने कुठे गेले हे अद्यापही समोर आलेले नाही. आरोपी अटकेत असताना सोने हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नेमके सोन्याचे गौडबंगाल काय याची चर्चा सुरू आहे.
दरोड्याचा मुख्य आरोपी अमोल खोतकरचे एन्काउंटर झाल्यानंतर पाचही दरोडेखोरांनी सर्व सोने अमोलकडेच असल्याची ओरड केली. मात्र अमोल सोबत दरोड्यानंतर फिरलेला सुरेश गंगणेने अंबाजोगाई, नांदेड येथील मित्रांमार्फत सोन्याची विल्हेवाट लावल्याचे समोर आले होते.
त्याचा साथीदार सूर्यकांत मुळेलाही अटक करून कार जप्त केली. गंगणे हर्मूलला गेल्यापासून पोलिसांनी अमोलच्या जवळच्या व्यक्तींची चौकशी सुरू केली. त्याच्या बहिणीच्या चौकशीनंतर ३० किलो चांदी सापडली. मैत्रीण खुशीच्या चौकशीतून नांदेडचा रूपेश पत्रे पोलिसांच्या हाती लागला. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली असली तरी सोने काही हाती लागलेले नाही.