

Nanded News: Women repair the check dam; administration remains indifferent
देवबा डोरले
तामसा : हदगाव तालुक्यातील लोहा येथील महिला शेतकरी बचत गटाने शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेला चपराक लगावत नादुरुस्त बंधाऱ्याची दुरुस्ती करून एक आदर्श निर्माण केला आहे. वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासह पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. मात्र, संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर महिलांनी बंधाऱ्याच्या दुरूस्तीसाठी पुढाकार घेतला.
मागील अनेक वर्षांपासून येथील बंधाऱ्याची दुरवस्था झाल्यामुळे पावसाचे पाणी साठविण्यात अडचणी निर्माण होत होत्या. परिणामी परिसरातील विहिरी, बोअरवेल आणि शेतीसाठी आवश्यक असलेल्या जलस्रोतांवर विपरीत परिणाम होत होता. ही गंभीर समस्या प्रशासनाच्या वारंवार निदर्शनास आणून दिल्यानंतर याबाबत संबंधि प्रशासनाच्या वतीने कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. दरम्यान, शासनाकडून जलसंधारण, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकासासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविल्या जात असल्याचा गाजावाजा केला जातो.
मात्र प्रत्यक्षात ग्रामीण भागातील मूलभूत समस्या कायम असल्याचे चित्र लोहा येथील या घटनेतून समोर आले आहे. जर महिला बचत गटाने पुढाकार घेतला नसता, तर हा बंधारा आजही नादुरुस्त अवस्थेतच राहिला असता.
सावित्रीबाई फुले महिला शेतकरी बचत गट, उमेद आणि पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने महिलांनी श्रमदान करून बंधाऱ्याची दुरुस्ती केली. या उपक्रमामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होणार असून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच भूजल पातळीत वाढ होऊन परिसरातील पिण्याच्या पाण्याची समस्या काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महिलांनी केलेले हे कार्य प्रेरणादायी असले, तरी शासन आणि संबंधित विभागांच्या निष्क्रियतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याच्या प्रतिक्रिया आता उमटताना दिसून येत आहेत.