

Paithan News : Sholay style protest of women farmers again
पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील तहसील कार्यालयाच्या पाण्याच्या टाकीवर महिला शेतकऱ्याने शुक्रवारी (दि.२९) पुन्हा एकदा शोले स्टाईल आंदोलन केले. तालुक्यातील ढोरकीन परिसरातील महिला शेतकरी शोभा बबन कुदळे यांनी यापूर्वी सोमवारी (दि. २५) अशाच प्रकारे आंदोलन केले होते.
स्वतःच्या मालकीच्या शेती जमिनीच्या सातबारावर चुकीच्या व्यक्तीचा घेतलेला फेर रद्द करण्याची त्यांची मागणी आहे. महसूल विभागाकडून सदरील फेर रद्द करण्यात येत नसल्याचा आरोप करून या शेतकरी महिलेने थेट कोणालाही काही एक न सांगता तहसील कार्यालयाच्या परिसरातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सोमवारी केले होते.
सपोनि ईश्वर जगदाळे यांच्या पोलीस पथकाने या महिलेची समजूत काढत टाकीवरुन खाली उतरविले होते. परंतु पुन्हा एकदा या महिलेने शुक्रवारी सकाळी पाण्याच्या टाकीवर चढून अचानक आंदोलन सुरू केले. पोलिस उपनिरीक्षक वैभव सारंग, यांच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करीत असलेल्या महिलेला दुपारपर्यंत समजूत काढत टाकीवरून खाली उतरविले.
प्रशासन म्हणते तुम्ही न्यायालयात जा
फेर रद्द करण्याच्या प्रक्रिया संदर्भात उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी सुनावणी घेऊन. फेर रद्द करण्याच्या मागणीसाठी न्यायालयात जाण्याचा सल्ला बाफना यांनी सदर महिलेला दिला आहे.