

नायगाव : नरसी येथील मुख्य चौकासह नरसी–मुखेड, नरसी–बिलोली, नरसी–देगलूर आणि नरसी–नांदेड या प्रमुख मार्गांवरील तब्बल २० ते २५ वर्षांपासूनची अतिक्रमणे बुधवारी प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने हटवून धडक कारवाई केली. वारंवार नोटिसा देऊनही अतिक्रमणे न हटविणाऱ्या अतिक्रमणधारकांवर अखेर बुलडोझर चालविण्यात आला. या कारवाईमुळे अनेक वर्षांपासून अडथळा ठरत असलेले रस्ते मोकळे झाले असून परिसरात या मोहिमेची जोरदार चर्चा सुरू आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधितांना यापूर्वी अनेकदा नोटिसा बजावत स्वखर्चाने अतिक्रमणे हटविण्याची संधी दिली होती. मात्र, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याने महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाईचा निर्णय घेतला.
कारवाईची माहिती मिळताच अनेक व्यापाऱ्यांनी व अतिक्रमणधारकांनी स्वतःहून पत्र्याचे शेड, ओटे, दुकाने आणि इतर साहित्य हटविण्यास सुरुवात केली. मात्र, काही ठिकाणी अतिक्रमणे न हटविणाऱ्यांवर जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली. काही तासांतच अनेक वर्षांपासून रस्त्यांवर अडथळा ठरत असलेली अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.
बिलोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्याम पानेगावकर यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली रामतीर्थ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विक्रम हराळे,शिवराज नरवाडे, यांच्या सह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती. काही ठिकाणी नाराजी व्यक्त झाली असली तरी प्रशासनाने कोणतीही माघार न घेता कारवाई पूर्ण केली.
नरसी चौक हा परिसरातील प्रमुख वाहतूक केंद्र असल्याने वाढत्या अतिक्रमणांमुळे रस्त्यांची रुंदी कमी झाली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांची गैरसोय वाढत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत होत्या. विशेषतः बाजाराच्या दिवशी व सणासुदीच्या काळात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
या संयुक्त कारवाईत महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. कारवाईनंतर नरसी चौकासह प्रमुख मार्गांवरील वाहतूक सुरळीत झाली असून वाहनचालक व नागरिकांनी प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले. अनेक वर्षांपासून अतिक्रमणांच्या विळख्यात अडकलेल्या नरसी चौकाला या मोहिमेमुळे दिलासा मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
नियम मोडणाऱ्यांना प्रशासनाचा स्पष्ट इशारा
सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांविरोधात प्रशासनाने यापुढेही कठोर भूमिका कायम ठेवण्याचे संकेत या कारवाईतून दिले आहेत. नोटिसांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.