Umarkhed tractor blast: वेल्डिंग करताना ब्लास्टिंग ट्रॅक्टरचा भीषण स्फोट; चौघांचा मृत्यू, १० जखमी

उमरखेड-ढाणकी मार्गावरील जाकीर हुसेन वॉर्ड परिसरात किसान वेल्डिंग वर्कशॉपसमोर ब्लास्टिंगच्या ट्रॅक्टरला वेल्डिंग करताना झालेल्या भीषण स्फोटात चौघांचा मृत्यू झाला.
Umarkhed tractor blast
Umarkhed tractor blastpudhari photo
Published on: 
Updated on: 

Umarkhed tractor blast

उमरखेड : उमरखेड-ढाणकी मार्गावरील जाकीर हुसेन वॉर्ड परिसरात किसान वेल्डिंग वर्कशॉपसमोर ब्लास्टिंगच्या ट्रॅक्टरला वेल्डिंग करताना झालेल्या भीषण स्फोटात चौघांचा मृत्यू झाला. तर दहा जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी उमरखेड पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर मालक, चालक आणि स्फोटके पुरविणारा अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना शनिवारी (दि. 26) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळदी येथील अप्पाराव माधवराव बोक्से यांच्या मालकीचा एमएच 29 व्ही 2528 क्रमांकाचा ब्लास्टिंग ट्रॅक्टर वेल्डिंगच्या कामासाठी किसान वेल्डिंग वर्कशॉपसमोर आणण्यात आला होता. ट्रॅक्टरला वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता एवढी होती की, ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिसरातील मारुती ईको (एमएच 03 बीसी 1880) आणि बोलेरो मॅक्स पिकअप (एमएच 29 टी 6942) या वाहनांचेही नुकसान झाले.

Umarkhed tractor blast
Nanded Drowning | गणेश विसर्जनावेळी तरुणाचा पैनगंगेत बुडून मृत्यू; ५ जणांना वाचविण्यात यश

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी ब्लास्टिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘Super Power 90 (Emulsion Explosives) SOLAR’ असे नमूद असलेल्या पांढऱ्या रंगाच्या अंदाजे 40 ते 50 अर्धवट फुटलेल्या ट्यूब तसेच लाल रंगाच्या कॉर्डेक्स वायरचे बंडल आढळून आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या स्फोटात अविनाश केशव बेले (35, रा. बाळदी तांडा), वैभव अप्पाराव बोक्से (20, रा. बाळदी), शेख जावेद शेख जमीर (23, रा. जाकीर हुसेन वॉर्ड, उमरखेड) आणि सैयद शाहजेब सैयद अनिस (15, रा. आझाद वॉर्ड, उमरखेड) यांचा मृत्यू झाला. तर ट्रॅक्टर मालक अप्पाराव माधवराव बोक्से (55) आणि वेल्डिंग करणारा बाशीद खान रशीद खान (32, रा. काजीपुरा, उमरखेड) हे गंभीर जखमी झाले आहेत. अन्य जखमींवर उमरखेड तसेच नांदेड येथील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गंभीर जखमी ट्रॅक्टर मालक अप्पाराव बोक्से यांची नांदेड येथील यशोसाई हॉस्पिटलमध्ये चौकशी करण्यात आली. त्यावेळी ट्रॅक्टरमध्ये असलेल्या स्फोटकांचा स्फोट वेल्डिंग करताना झाल्याचे त्यांनी सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. तसेच ही स्फोटके ढाणकी येथील बळीराम नरवाडे यांच्याकडून आणल्याचे त्यांनी सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांच्या फिर्यादीनुसार, ट्रॅक्टर मालक अप्पाराव बोक्से व चालक वैभव बोक्से यांनी स्फोटके बाळगण्यासाठी आवश्यक परवाना नसताना ती ट्रॅक्टरमध्ये ठेवून निष्काळजीपणे हाताळल्याचा आरोप आहे. तसेच बळीराम नरवाडे यांनी आवश्यक परवानगी नसलेल्या व्यक्तींना स्फोटके पुरविल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी अप्पाराव माधवराव बोक्से (55, रा. बाळदी), वैभव अप्पाराव बोक्से (20, रा. बाळदी) आणि बळीराम नरवाडे (50, रा. ढाणकी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास उमरखेड उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक गौरव कायंदे-पाटील करीत आहेत. स्फोटके कुठून, कोणत्या परवान्याअंतर्गत आणि कोणत्या उद्देशाने आणण्यात आली होती, यासह स्फोटाच्या नेमक्या कारणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Umarkhed tractor blast
Nanded News | शासन मंजुरी मिळाली; ढाणकीतील अप्पर तहसीलदार कार्यालय कधी सुरू होणार?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news