

Nanded News: Attack on Telangana Police team
किनवट, पुढारी वृत्तसेवा : तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील बाजार हतनूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी किनवट येथे आलेल्या तेलंगणा पोलिसांच्या पथकावर रविवारी (दि. ३०) सायंकाळी चिखली फाट्याजवळ हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली. पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली असून, दोन पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या गोंधळात आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पसार झाला असून, जमावाने त्याला सोडवून नेल्याची प्राथमिक माहिती आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तेलंगणा पोलिसांच्या पोलीस उपनिरीक्षकाने आत्मसंरक्षणासाठी हवेत गोळीबार केल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्राथमिक माहितीनुसार, किनवट तालुक्यातील चिखली येथील एका व्यक्तीविरुद्ध ऑटो चोरीप्रकरणी तेलंगणातील बाजार हतनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी बाजार हतनूरचे पोलीस उपनिरीक्षक पी. रमेश हे तीन पोलिस कर्मचाऱ्यांसह रविवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता साध्या वेशात किनवट येथे आले होते. किनवट पोलिस ठाण्यालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये संबंधित आरोपी चहा पीत असल्याचे तेलंगणा पोलिसांच्या पथकाच्या निदर्शनास आले.
त्याला ताब्यात घेण्यासाठी पथक हॉटेलमध्ये गेले असता, त्याच्या काही साथीदारांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. मात्र, तेलंगणा पोलिसांनी संबंधित आरोपीला ताब्यात घेऊन किनवट पोलिस ठाण्यात आणल्याचे सूत्रांनी सांगितले. किनवट पोलिसांना आरोपीबाबत माहिती दिल्यानंतर तेलंगणा पोलिसांचे पथक सायंकाळी सुमारे सहा वाजता आरोपीसह बाजार हतनूरकडे रवाना झाले. मार्गातील चिखली फाट्याजवळ काठ्या व दगड घेऊन मोठा जमाव उभा असल्याचे दिसले.
संशय आल्याने पोलिसांनी काही अंतरावरूनच वाहन वळवून पुन्हा किनवटकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अंतरावर समोरून तीन-चार ऑटोमधूनही काही व्यक्ती आले. या जमावाकडून पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. यात वाहनाच्या समोरील व बाजूच्या काचा फुटल्या. तसेच पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांवर लाथा-बुक्क्यांनी हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी किनवट पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
उपनिरीक्षकाचा हवेत गोळीबार
परिस्थिती अधिकच गंभीर बनल्याने उपनिरीक्षक पी. रमेश यांनी आत्मसंरक्षणासाठी आपल्या सव्र्हिस रिव्हॉल्वरमधून हवेत गोळीबार केला. यानंतर तेलंगणा पोलिसांचे पथक नुकसानग्रस्त वाहनासह किनवट पोलिस ठाण्यात परतले व घडलेल्या घटनेची माहिती दिली.