Nanded e crop survey : आता सहायकांकडून होणार ई-पीक पाहणी

११ ऑगस्ट ते १० नोव्हेंबरपर्यंत मोहीम ; पीक नोंदणी पूर्णत: मोफत
Kinwat e crop survey
Kinwat e crop surveypudhari photo
Published on
Updated on

अरुण तम्मडवार

किनवट : खरीप हंगामातील पिकांची अचूक डिजिटल नोंद करण्यासाठी किनवट तालुक्यात ‘सेंट्रली डिजिटल क्रॉप सर्व्हे’ (डीसीएस) अर्थात ई-पीक पाहणी मोहीम सुरू करण्यात आली असून, यंदा शेतकऱ्यांऐवजी नियुक्त सहायक प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी व ऑनलाइन नोंदणी करणार आहेत. ११ ऑगस्ट ते १० नोव्हेंबर या कालावधीत ही मोहीम राबविली जाणार असून, पीक नोंदणीची प्रक्रिया पूर्णतः मोफत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

यापूर्वी शेतकऱ्यांना स्वतःच्या मोबाईलद्वारे ॲपवर पीक पाहणी करावी लागत होती. मात्र, नेटवर्कचा अभाव, तांत्रिक अडचणी आणि मोबाईल ॲपच्या वापरातील अडथळ्यांमुळे अनेक शेतकऱ्यांना ही प्रक्रिया त्रासदायक ठरत होती. यंदा शासनाने त्यात बदल करून पीक पाहणीची जबाबदारी गावपातळीवरील नियुक्त सहायकांकडे सोपविली आहे.

Kinwat e crop survey
Nanded farmer loan waiver : नांदेड जिल्ह्यात कर्जमुक्तीचा 'दुसरा टप्पा' सुरू; ३८१ कोटी ९४ लाख निधी सुपूर्द

या कामासाठी कोतवाल, ग्रामरोजगार सेवक, आशा सेविका, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील ‘उमेद’ कर्मचारी, सीएससी चालक तसेच शासनाने निश्चित केलेल्या पात्र व्यक्तींमधून सहायकांची नियुक्ती करण्यात येत आहे. नियुक्त सहायक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी करतील आणि त्याची नोंद डिजिटल प्रणालीवर करतील.

ई-पीक पाहणीतील नोंदी पीकविमा, नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपोटी मिळणारी मदत, विविध कृषी योजना, पीकआधारित अनुदान, कृषी सांख्यिकी तसेच अॅग्रीस्टॅकसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकही पात्र शेतकरी पीक नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.

दरम्यान, पीक पाहणी व नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडून कोणतीही फी आकारली जाणार नाही. ही प्रक्रिया पूर्णतः मोफत असल्याने शेतकऱ्यांनी कोणत्याही व्यक्तीस अनधिकृत रक्कम देऊ नये. अशा प्रकारे पैसे मागितले जात असल्यास संबंधित महसूल प्रशासनाकडे तक्रार करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Kinwat e crop survey
Umarga ADIP camp : ‘ज्यांच्यासाठी शिबीर, त्यांचीच उपेक्षा!’

सहायकाने केलेल्या पीक पाहणीची संबंधित महसूल यंत्रणेकडून पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर पीक नोंदी पुढील शासकीय प्रक्रियेसाठी ग्राह्य धरल्या जातील. नोंदीमध्ये काही त्रुटी आढळल्यास शेतकऱ्यांनी वेळेत संबंधित अधिकाऱ्यांकडे दुरुस्तीसाठी पाठपुरावा करावा. ई-पीक पाहणीचे काम करताना नियुक्त सहायकांना काही तांत्रिक अथवा इतर अडचणी आल्यास त्यांनी तालुकास्तरीय मास्टर ट्रेनर विश्वास फड (तलाठी, किनवट) यांच्याशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.

ई-पीक पाहणी ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. पिकांची प्रत्यक्ष व अचूक नोंद होण्यासाठी शेतकऱ्यांनी नियुक्त सहायकांना आवश्यक ते सहकार्य करावे. ही सेवा पूर्णतः मोफत असून, सर्व पात्र शेतकऱ्यांची पीक नोंदणी मुदतीत पूर्ण व्हावी, यासाठी कृषी व महसूल विभाग समन्वयाने कार्यरत आहेत.

डॉ. शारदा चोंडेकर, तहसीलदार, किनवट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news