

Naigaon Blackbuck Rescued from Well
नायगाव : नायगाव तालुक्यातील सावरखेड शिवारात पाण्याच्या शोधात आलेल्या एका काळविटाचा विहिरीत पडल्याची घटना मंगळवारी (दि. ७ एप्रिल) उघडकीस आली. वन विभागाच्या तत्पर कारवाईमुळे या वन्यप्राण्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
सावरखेड परिसरातील तुकाराम वानखेडे यांच्या शेतातील उघड्या विहिरीत पाण्याच्या शोधात आलेले काळविट घसरून पडले. ही बाब लक्षात येताच पोलिस पाटील शिवराज ढगे यांनी वन विभागाला तात्काळ माहिती दिली. त्यानंतर वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
उपवनसंरक्षक मनिषा पाटील, सहायक वनरक्षक खेळबोडे, वनपरिक्षेत्र अधिकारी देवकत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक गजानन कोतलवार व वनमजूर तसेच स्थानिक ग्रामस्थांनी मिळून तातडीने बचावकार्य सुरू केले. विहिरीत जाळी टाकून आणि दोरांच्या सहाय्याने काळविटाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हे कार्य अधिक सुलभ झाले.
दरम्यान, वाढत्या उन्हामुळे जंगलातील पाणवठे आटत असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर जंगलात तसेच गावालगतच्या भागात वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय करण्याची गरज व्यक्त होत आहे. तसेच उघड्या विहिरींवर सुरक्षेसाठी जाळी किंवा झाकण बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नागरिकांची सतर्कता आणि वन विभागाच्या वेळीच केलेल्या प्रयत्नांमुळे एका निष्पाप जीवाचे प्राण वाचले असून या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.