

Latur Nanded highway car truck collision
अहमदपूर : लातूर- नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील चेवले ऑटोमोबाईल समोर नांदेडकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकला पाठीमागून कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन युवक जागीच ठार झाले. ही घटना मध्यरात्री १.३० वाजता घडली. हा अपघात इतका भीषण होता, की ट्रकमध्ये अडकलेली क्रेटा कार क्रेनच्या सहाय्याने ओढून काढावी लागली. व त्यानंतर कटरच्या सहाय्याने कारचा दरवाजा कापून मृतदेह बाहेर काढले.
या भीषण अपघातात रवी दराडे व चिऊ ऊर्फ सागर ससाणे हे दोन तरूण जागीच ठार झाले आहेत.
या बाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, की अहमदपूर येथील लातूर- नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील चेवले ऑटोमोबाईल समोर लातूरहून नांदेडकडे जाणाऱ्या (के.ए.३२ डी.०९५६) या मालवाहू ट्रकला (एम.एच.२४ ए.टी.-९७७७) या क्रेटा कारने पाठीमागून जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी जोरदार व भीषण होती की कारचा समोरचा संपूर्ण भाग ट्रकच्या पाठीमागील भागात घुसला. त्यात कार जाऊन अडकली. या घटनेत शहरातील इंदिरा नगर येथील चिऊ ऊर्फ सागर ससाणे व कराड नगर येथील रवी दराडे या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचा तपास अहमदपूर पोलीस करत आहेत.