

संतोष जोशी
नांदेड : नांदेड महानगरपालिकेच्या राजकारणात सोमवारी एक मोठी आणि अनपेक्षित घडामोड पहायला मिळाली. प्रत्यक्ष विधिमंडळ किंवा संसदेत जाण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या दोन दिग्गज नेत्यांना अखेर महापालिकेचे स्वीकृत सदस्य म्हणून समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, या दोन्ही नेत्यांनी हे पद स्वीकारल्याने राजकीय वर्तुळात ही चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे.
राजकीय परिस्थितीशी जुळवून घेण्याची नामुष्की?
नांदेड दक्षिण मतदारसंघातून तीन वेळा विधानसभेची निवडणूक लढविलेले आणि भाजपचे माजी महानगराध्यक्ष राहिलेले ज्येष्ठ नेते दिलीप कंदकुर्ते यांनी आपले पुत्र कुणाल कंदकुर्ते यांच्यासाठी फिल्डिंग लावली होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी “तुम्हाला व्हायचे असेल तर व्हा” असा शब्द टाकताच, आलेली संधी दवडण्यापेक्षा कंदकुर्ते यांनी स्वतः स्वीकृत सदस्यपद स्वीकारणे पसंत केले.
दुसरीकडे, डॉ. देवसरकर यांनी लोकसभा आणि विधानसभेच्या तिकिटासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, तिथे संधी न मिळाल्याने त्यांनी आपल्या पत्नीला स्वीकृत सदस्य करण्याची मागणी लावून धरली होती. परंतु, पक्षाने त्यांनाच ही जबाबदारी घेण्यास सांगितले. अखेर तेलही गेले आणि तूपही गेले अशी अवस्था होऊ नये, म्हणून त्यांनीही या पदाचा स्वीकार केला.
लोकसभा आणि विधानसभेच्या सभागृहात जाण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या या दोन्ही नेत्यांना आता महापालिकेच्या सभागृहात काम करावे लागणार आहे. ही रणनीती त्यांच्या राजकीय प्रवासाला खीळ घालणारी ठरेल की, पुढच्या झेपसाठी दोन पाऊल मागे या धोरणाचा भाग आहे, हे येणारा काळच ठरवेल.
कंदकुर्ते यांची राजकीय कारकीर्द
दिलीप कंदकुर्ते हे पूर्वी काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाणांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. त्यांनी महापालिकेत नगरसेवक ते स्थायी समिती सभापती असे महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत. 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर, तर 2019 आणि 2024 मध्ये अपक्ष म्हणून त्यांनी विधानसभा लढवली होती. वारंवार बंडखोरी करूनही भाजपने त्यांना स्वीकृत सदस्यपद दिल्याने राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे.
निवड प्रक्रियेत खा.अशोक चव्हाणांचा शब्द अंतिम
नांदेड महापालिकेवर एकेकाळी काँग्रेसमध्ये असताना वर्चस्व गाजविणारे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही आपली पकड कायम ठेवली आहे. जातीय समीकरणे आणि पक्षाची ध्येयधोरणे यांचा अचूक मेळ घालत त्यांनी भाजपची सत्ता आणून इतिहास घडवला. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती आणि आता स्वीकृत सदस्यांच्या निवडीत चव्हाणांचे सूक्ष्म नियोजन दिसून आले. भाजपच्या कोअर कमिटीपेक्षा चव्हाणांचा शब्दच या निवडींमध्ये अंतिम ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच कंदकुर्ते आणि डॉ. देवसरकर यांच्याबाबतचा निर्णयही चव्हाणांच्या तंत्राचाच एक भाग मानला जात आहे.