

नरेंद्र येरावार
उमरी: उमरी तालुक्यातील सावरगाव, कळगाव, शिरूर, कारला या भागात गेल्या तीन-चार दिवसापासून बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी सकाळी कळगाव (ता.उमरी) येथील गणेश पुरभाजी यमलवाड या शेतकऱ्याला बिबट्या दिसला. आरडाओरड करत आपला जीव वाचवण्यासाठी तो झाडावर चढला. बिबट्या आल्याची माहिती गावकऱ्यांना मिळताच शेकडो नागरिक, शेतकऱ्यांनी धाव घेतली.
दरम्यान रात्री गंगाधर आनंदा यमलवाड या शेतकऱ्यांच्या वगाराचा बिबट्याने हल्ला करून फाडशा पाडला. गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा कळगाव शिवारात बिबट्या दिसला. शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्या पळाला. या संदर्भात वन विभागाला कळविण्यात आले. परंतु आमच्याकडे बिबट्याला पकडण्यासाठीची यंत्रणा नाही, आमच्याकडे तेवढे मनुष्यबळ नाही म्हणून वन अधिकाऱ्याकडून सांगितल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व्यंकटराव केसगिरे यांनी दैनिक पुढारीशी बोलतांना सांगितले. दरम्यान शिरूर शिवारात बिबट्या दिसल्याचे तंटामुक्ती अध्यक्ष दासा पाटील शिंदे यांनी सांगितले. सावरगाव शिवारात विष्णुकांत पोटेवाड या शेतकऱ्याच्या आखाड्यावरही बिबट्या येऊन गेल्याचे सांगण्यात आले.
सध्या शेतातील रब्बी पिकाला पाणी देण्याचे काम सुरू असताना बिबट्याच्या मुक्त संचारामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या भागात ऊसाची तोड मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे ऊसात आश्रयाला लपून बसलेले बिबटे आता मोकळ्या रानात दिसत आहेत. उमरी तालुक्यात मुक्तपणे संचार करणाऱ्या बिबट्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी, या भागातील नागरिक करीत आहेत.
रानडुक्कर, नीलगायी, हरिण यांच्यानंतर आता बिबट्या परेशान करून सोडला आहे. अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आपल्या उभ्या पिकाचे रक्षण करण्यासाठी जीवाची बाजी द्यावी लागत आहे. अशा परिस्थितीत शेतातील पिके वाचवण्यासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत. रानडुक्कर, नीलगायी, हरीण यांनी मोठ्या प्रमाणात पिकाची नासाडी केली आहे. आणि आता बिबट्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाला आहे.