Nanded Legislative Council Election : नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघावर आता भाजपाचा झेंडा?

विधान परिषद निवडणूक जाहीर ः राजूरकरांसह वेगवेगळ्या नावांची चर्चा
Nanded Legislative Council Election
Nanded Legislative Council Electionpudhari photo
Published on
Updated on

संजीव कुळकर्णी

नांदेड ः तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. हा मतदारसंघ निर्माण झाल्यापासून त्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले; पण आता या मतदारसंघावर भाजपा झेंडा फडकण्याची शक्यता बळावली आहे.

राज्यातील अन्य जिल्ह्यांतही वरील मतदारसंघाची निवडणूक 18 जून रोजी होणार आहे. नांदेड जिल्ह्यात नांदेड जि.प. व जिल्ह्यातील 16 पंचायत समित्यांवर अजूनही प्रशासकीय राजवट आहे; पण नांदेड मनपासह जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा-नगर पंचायतींत लोकप्रतिनिधींची राजवट असल्यामुळे रखडलेली वरील निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकीसाठी मतदारांची संख्या साडेचारशेच्या आसपास आहे. त्यांत भाजपा-मजपा आघाडीच्या मतदारांची संख्या सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले.

Nanded Legislative Council Election
Municipal Election | देवाभाऊंचाच करिष्मा!

1986 ते 2022 या सुमारे तीन तपांच्या कालावधीत या मतदारसंघावर काँग्रेसतर्फे (कै.) किशन राठोड मग कमलकिशोर कदम आणि अमरनाथ राजूरकर यांनी प्रत्येकी 12 वर्षे प्रतिनिधित्व केले. वरील काळात जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसचे प्राबल्य होते, तर भाजपाचे स्थान नगण्य होते; पण 2016च्या निवडणुकीत भाजपाने माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांना उभे करून काँग्रेसच्या राजूरकर यांना जेरीस आणले होते, तरी अटीतटीच्या या ‌‘अर्थ‌’पूर्ण लढतीत शेवटी राजूरकर यांची सरशी झाली होती.

त्यानंतरच्या 10 वर्षांनी जिल्ह्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. 1992 पासूनच्या पाच निवडणुकांत काँग्रेसला यश मिळवून देणारे ज्येष्ठ नेते, खा.अशोक चव्हाण हे आता भाजपामध्ये असून पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत भाजपाचे नेतृत्व त्यांच्याकडेच राहील. कारण नांदेड मनपा व जिल्ह्यातील भोकर, मुदखेड, बिलोली, धर्माबाद आदी नगर परिषदांत भाजपा-मजपाचे बहुमत आणण्यात चव्हाण-राजूरकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

अमरनाथ राजूरकर यांनी वरील मतदारसंघाचे 2010 ते 2022 या कालावधीत काँग्रेसतर्फे प्रतिनिधित्व केले होते. विधान परिषदेत त्यांनी पक्षाचे प्रतोदपदही भूषविले. ते आता भाजपाचे महानगराध्यक्ष असून आपल्या हक्काच्या या मतदारसंघाच्या उमेदवारीवर भाजपातर्फे पहिला दावा त्यांचाच असल्याचे सांगण्यात येत आहे.

Nanded Legislative Council Election
Parbhani ZP Elections : अखेर नऊ वर्षांनंतर मिनी मंत्रालयाची रणधुमाळी

भाजपातील काही जुन्या कार्यकर्त्यांकडूनही पक्षाकडे उमेदवारीची मागणी होऊ शकते; पण निवडणुकीसाठी असलेल्या मतदारांमधून सर्वाधिक समर्थन राजूरकर यांच्या नावाला मिळेल, अशी एकंदर स्थिती आहे. असे असले, तरी त्यांचे स्पर्धक म्हणून किशोर मल्लिकार्जुन स्वामी, चैतन्यबापू देशमुख, संजय कौडगे आदी नावांचीही पक्षामध्ये चर्चा आहे.

नांदेड महानगर भाजपाचे निवासी प्रशिक्षण शिबिर शहरालगतच्या एका सभागृहात रविवारपासून सुरू झाले. त्यानिमित्त वेगवेगळ्या सत्रांमध्ये शिबिरार्थींचे प्रबोधन सुरू असतानाच सोमवारी सकाळी वरील निवडणुकीची माहिती समोर आल्यानंतर राजूरकरांच्या समर्थकांमध्ये उत्साह निर्माण झाला. या निवडणुकीची अधिसूचना 25 मे रोजी निघणार आहे. तर उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 1 जूनला असल्यामुळे स्थानिक भाजपामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने हालचाली सुरू झाल्याचे बघायला मिळाले. नांदेडसह अन्य 16 जिल्ह्यांमध्ये वरील निवडणूूक होणार आहे.

राज्यातल्या महायुतीतील तीन प्रमुख पक्षांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने नांदेडच्या जागेवर दावा केल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पक्षनेतृत्वाकडे तशी मागणीही केली; पण एकंदर राजकीय समीकरण पाहता नांदेडची जागा भाजपाच्या वाट्याला सुटणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

Nanded Legislative Council Election
Maval Panchayat Samiti Election: मावळ पंचायत समितीवर कोणाचा झेंडा? भाजप की राष्ट्रवादी—उत्सुकता शिगेला

मागील अनेक निवडणुकांत या मतदारसंघात भाजपाचे स्थान अत्यंत नगण्य होते. 1986 साली या पक्षाच्या मुदखेडमधील नगरसेवकांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मदत केली. नंतर 92 साली काँग्रेस विरोधात लढलेल्या मोहन पाटील टाकळीकर यांना भाजपाने मदत केली. 2010 साली तर भाजपाने या निवडणुकीतून पळ काढला होता. मग शिवसेनेने माघार घेतल्यामुळे राजूरकर बिनविरोध निवडून आले होते; पण आता हाच भाजपा या मतदारसंघावर आपला झेंडा फडकविण्याच्या तयारीमध्ये आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news