

नांदेड ः नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोक्काअंतर्गत गेल्या काही काळापासून फरार असलेल्या एका कुख्यात आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून म्हाळजा माळटेकडी परिसरातून अटक केली.
सोहेल खान ऊर्फ चिंधी फिरोजखान पठाण (वय 25, रा. बालाजीनगर, हिंगोली नाका, नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.या मोहिमेला ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ असे नाव देण्यात आले असून, त्या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांना विशेष सूचना देण्यात आल्या होत्या.
माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने तातडीने या परिसरात धाव घेत कसून शोध सुरू केला. पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या चिंधी पठाणला पथकाने अत्यंत शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, तो मोक्का कायद्यांतर्गत पाहिजे असलेलाच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला विमानतळ पोलिस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून रचला सापळा
मिळालेल्या माहितीनुसार, 4 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे हे आपल्या पथकासह शहरात पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, विमानतळ पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि मोक्काअंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी सोहेल खान ऊर्फ चिंधी हा म्हाळजा माळटेकडी परिसरात वावरत असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली.