

Nanded Illegal Murum mining
नायगाव, पुढारी वृत्तसेवा : नायगाव तालुक्यात सुट्टीच्या दिवशी अवैध मुरूम जोमात चालू असून याला तहसीलदार व उपजिल्हाधिकारी यांचा मूक पाठिंबा असल्याने हा प्रकार चालू आहे. तसेच बिलोली तालुक्यातील गागलेगाव येथील गायरान जमीन गट क्रमांक ७८ मधून मागील आठवड्यात शेकडो ब्रास मुरूमाचे मोठ्या प्रमाणावर विनापरवाना उत्खनन झाल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात थेट तक्रार दाखल केली असून प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गागलेगाव (ता. बिलोली) येथील गट क्रमांक ७८ मध्ये सुमारे ३ हेक्टर २८ आर इतकी गायरान जमीन आहे. यालगतचा गट क्रमांक ७९ हा प्रकाश किशन उत्तरवार यांच्या मालकीचा खासगी गट असून तेथेच मुरूम उत्खननास अधिकृत परवानगी देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात परवाना असलेल्या गटाचे बाजूला ठेऊन गायरान जमिनीवरच उत्खनन केले गेले.
स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या आरोपानुसार, बिलोली व नायगाव तहसील कार्यालयातील काही अधिकारी व स्थानिक राजकारण्यांच्या आशीर्वादामुळे या अवैध धंद्याला अभय मिळाले आहे. उपविभागीय अधिकारी (बिलोली) यांचीही मूक संमती असल्याचे ग्रामस्थ म्हणतात.
नायगावसह नांदेड जिल्ह्यात अवैध मुरूम उत्खननासह अवैध वाळू उपसा सर्रासपणे सुरू आहे. मात्र याकडे महसूल प्रशासन आणि पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे.
दोन दिवसांपूर्वी मांजरम सर्कलमध्ये एक जेसीबी मंडळ अधिकारी यांनी थांबवला होता. मात्र, तहसीलदारांच्या राजकीय दबावामुळे आर्थिक तडजोड करून शनिवारी-रविवारी पुन्हा अवैध उत्खनन सुरू झाले, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिस प्रशासनही या प्रकरणात मौन बाळगून असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गायरान जमिनीवर उत्खनन करणारे जबाबदार कोण?
परवाना गट ७९ साठी, उत्खनन गट ७८ मध्ये का?
तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांचे भूमिकेचे खुलासे कधी?
पोलिस प्रशासन आर्थिक तडजोडीत सामील का ?