

50 crores in the treasury of Mahurgad
नांदेड, पुढारी वृत्तसेवा: शेकडो वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेले माहूर येथील आदिशक्तीचे एक पूर्ण पीठ एक तपापूर्वी चांगले नावारुपाला आले आहे. ट्रस्टच्या पदसिद्ध अध्यक्षपदाची जबाबदारी जिल्हा मुख्य न्यायाधिशांकडे सोपवल्यामुळे संपूर्ण कारभार शिस्तबद्ध चालू आहे. मागील काही वर्षात देवस्थानच्या गंगाजळीत सुमारे ५० कोटी रुपयांची देणगी जमा झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला. याशिवाय सोने-चांदी व दागिने वेगळे.
२०१० च्या पूर्वी देवस्थानावर कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता. जिसकी लाठी उसकी भैंस या न्यायाने कारभार चालत असे. परिणामी देवस्थानचा म्हणून पैसा कधी दिसतच नव्हता. त्यामळे ऐन सण उत्सवांच्यावेळी सुव्यवस्था ठेवण्यात व सण आनंदाने साजरा करण्यात अडथळे येत असत, या वरुन आपसात अनेकवेळा कमालीची वितुष्टही निर्माण झाले. परंतु पुढे सर्वानुमते एक विश्वस्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेला. त्या समितीच्या पदसिद्ध अध्यक्षस्थानी नांदेडच प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांची नियुक्ती केली गेली. तेव्हापासून एकूणच कारभाराला सूर सापडला आहे.
नियमित बैठका, वारंवार सूचना, पूर्वतयारी, भाविकांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य, आवश्यक त्या दुरुस्त्या आदी सर्व बाबी वेळेवर होऊ लागल्या. याशिवाय युती सरकारने गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या रस्त्याचे चित्र बदलून टाकले. माहूर येथेही राहण्याच्या व जेवणाच्या चांगल्या सुविधा निर्माण झाल्या. पर्यटन विभागाचे विश्रामगृह सुद्धा दर्जेदार झाले आहे. आणखीही विकासकामे सुरु आहेत. पिण्याच्या पाण्याची तहान भागविणारा २२२ कोटी रुपयांचा उच्च पातळी बंधारा प्रगतीपथावर आहे.
वरील सर्व बाबीमुळे माहूरकडे महाराष्ट्रातील मुंबई, पुणे व पश्चिम महाराष्ट्र तसेच मध्य महाराष्ट्रातील भाविकांची संख्या वाढत चालली आहे. ही मंडळी सढळ हाताने दान देतात. आपल्या प्रियजनांच्या स्मृतिप्रित्यर्थ विविध लोकोपयोगी वस्तू भेट दिल्या जातात. पिण्याचे पाणी, साऊंड बॉक्स, यासह बसण्यासाठी बेंचेस, अन्नदान इत्यादी खर्च भाविक मनोभावे करतात. याशिवाय महिला-भगिनी घरात दररोज किंवा पगार होताच त्यातील दमडीही खर्च न करता अगोदर मोड काढून ठेवली जाते, असा सर्व पैसा देवीला अर्पण केला जातो. या प्रकारे मागील दीड दशकात सुमारे ५० कोटी रुपये जमले, असा अंदाज व्यक्त करण्यात येतो.
दरम्यान येत्या काळात नवरात्रनिमित्त होणाऱ्या उत्सवात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. शिवाय त्यानंतर दिवाळीतही सलग सुट्यामुळे येथे गर्दी होऊ शकते, त्यामुळे नगदी व सोने चांदी या माध्यमातून दानाचे संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष अधिकृत मोजणी झाल्यानंतरच याबाबत वस्तुस्थिती कळेल.