

Water entered low-lying areas including various colonies of the city
नांदेड, पुढारी वृत्तसेवा: शुक्रवार आणि शनिवारी दोन दिवस संततधार पाऊस झाला; परंतु या मध्यम स्वरूपाच्या पावसाने सखल भागात पाणी शिरले. शिवाय रस्त्यांच्या कामामुळे सुद्धा अनेक दुकाने व वसाहतीमध्ये पाणी शिरल्याने लोकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतो आहे.
पावसाळा सुरू होऊन सुमारे दीड महिन्यानंतर मागील आठवड्यात नियमित पावसाला सुरुवात झाली. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस २४ तासापेक्षा अधिक काळ बरसला. शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये बांधकामे सुरू आहेत. शिवाय रस्त्यांची पण कामे सुरू आहेत. त्यामुळे बांधकाम साहित्य रस्त्यावर पडले आहे. काही ठिकाणी खराब झालेली वाहने, बंद टपऱ्या या सुद्धा रस्त्यावरच आहेत. त्यामुळे पावसाचे पडलेले पाणी वाट मिळेल तिकडे वाहत जाते.
पावसाळ्यापूर्वी नाल्या पूर्णपणे उपसल्या गेल्या नसल्यामुळे घाणेरडे गटारीचे पाणी सुद्धा पावसात मिसळून अनेक लोकांच्या संरक्षण भिंतीत तसेच सखल भागातील घरात गेले. याबाबत सोशल मीडियावर अनेकांनी आपापल्या घराच्या अवस्थेचे चित्रीकरण करून व्हायरल केले आहे. महापालिकेने पावसाळापूर्वी कामे करावी, रस्त्यांची सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करावी, अंतर्गत भागात सुरू असलेल्या बांधकामावर मर्यादा घालाव्यात, बांधकाम साहित्य रस्त्यावर येणार नाही, याची काळजी घ्यावी. याबाबत नांदेडकरांतून सातत्याने विनंती, तक्रारी, ओरड होत होती; परंतु महापालिकेने त्याची दखल घेतली नाही. परिणामी या पावसाळ्याने पो लखोल केली असून गटाराचे घाण पाणी शहराच्या विविध भागात शिरले आहे.
पाऊस थांबून २४ तास होत आले तरी विविध भागात पाणी साचले असून आता इथून पुढे साथरोगांचे संकट भेडसावते आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने किटकजन्य जीव जंतूंच्या नायनाटासाठी सहकार्याचे आवाहन केले आहे. लोकांनी आपापल्या घरापुरते सफाई अभियान राबवले आहे, गच्चीवरील फुटक्या भांड्यातील उघडे पाणी काढून टाकले असले तरीही सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर रस्त्याच्या कडेला, मोकळ्या भूखंडात साचलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेल समस्या कोण सोडवणार हा प्रश्न निर्माण झाल आहे.
शहरातील प्रभात नगर, श्रीनगर, लालवाडी, नंदिग्राम सोसायटी, दत्तनगर, वसंत नगर, आनंद नगर, काबरा नगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाच्या पाण्याने उच्छाद मांडला असून या पाण्याचा निचरा होण्याच मार्ग शिल्लक नाही. जे मोठे नाले शहरातून वाहतात ते सुद्धा दुथडी भरून वाहत आहे. छोट्या नाल्या उलथून वाहत आहेत. आत इथून पुढे तरी रस्त्यांची रखडलेली कामे युद्धपातळीवर पूर्ण करावी व लोकांना दिलास द्यावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातून होत आहे.