

Flood water enters three settlements in Kinwat; residents evacuated
किनवट : तालुक्यातील काल शुक्रवारी रात्रीपासून तर किनवट शहरात आज पहाटे पाच पासून मुसळधार पावसास सुरूवात झाली आहे. ईसापूर धरणाचे पाच दरवाजे नेमके आजच सकाळी उघडण्यात आल्यामुळे, पैनगंगा दुथडी भरून वहात असून, खरबी पुलाच्या लागून पाणी जात आहे. परिणामी, पैनगंगा व शहराच्या उत्तरेकडील नाल्यांनाही पूर येऊन पाणी तटावरील शेतात व शहराच्या काही भागात पाणी शिरले आहे. शनिवारी (दि. 16) सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या गत 24 तासांत संपूर्ण तालुक्यातील नऊ महसूल मंडळात मिळून एकूण 229.4 मि.मी. पाऊस पडला असून, त्याची सरासरी 25.50 मि.मी. येते.
शनिवारी पहाटे तीन पासून ईसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे, धरणाच्या वरील बाजूच्या जयपूर बंधाऱ्याच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्याबाजूने येणारा येवा लक्षात घेऊन ईसापूर धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने अतिरिक्त सकाळी नऊ वाजता धरणाच्या सांडव्याची तीन वक्र द्वारे आणि त्यानंतर सकाळी दहा वाजता अजून दोन गेट अशी एकूण पाच वक्रद्वारे 50 सेंटिमीटरने उघडण्यात आली. सद्यस्थितीत पैनगंगा नदीपात्रात 4,988 क्यूसेक्स (141.229 क्यूमेक्स )इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार विसर्ग वाढवणे अथवा कमी करणे बाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे पैनगंगा नदी काठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन ईसापूर धरण पूर नियंत्रण कक्षाने केले आहे.
मुसळधार पावसामुळे शहरातील मोमीनपुरा, नालागड्डा, गंगानगरचा मागील भाग व बेल्लोरी नाल्याच्या काठावरील वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महसूल व पालिका प्रशासनाकडून पूरग्रस्तांना उर्दुशाळेत स्थलांतरित करण्यात येत आहे. पैनगंगा व नदी,नाल्याकाठच्या शेतात पाणी शिरल्यामुळे खरीप पिकांची अतोनात हानी झालेली असून, पिके चिबडणे,सडणे वा रोगट होण्याची शक्यता वाढलेली आहे.
शनिवारी सकाळी घेतलेली किनवट तालुक्यातील पावसाची नोंद पुढील प्रमाणे असून, कंसात 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या मंडळनिहाय पावसाची नोंद दिलेली आहे. किनवट- 24.0(552.8 मि.मी.); बोधडी- 35.5(713.7 मि.मी.); इस्लापूर- 34.0 (620.3 मि.मी.); जलधारा- 42.0 (629.4 मि.मी.); शिवणी- 30.8 (851.7 मि.मी.); मांडवी- 5.0 (579.6 मि.मी.); दहेली- 6.5 (585.0 मि.मी.), सिंदगी मो. 35.3 (611.7 मि.मी.); उमरी बाजार 16.3 (583.1 मि.मी.).
किनवट तालुक्यात जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यातील पावसाची सरासरी 1026.58 मि.मी.आहे. त्यातुलनेत आजपर्यंत प्रत्यक्षात 636.50 मि.मी. पाऊस पडलेला असून, त्याची टक्केवारी 62 आहे. एक जून ते आज पर्यंत पडणारा सरासरी पाऊस 638.60 मि.मी. असून, आतापर्यंत त्याच्या तुलनेत 99.67 टक्के पाऊस पडलेला आहे. जो की, समाधानकारक आहे. आतापर्यंत तालुक्यात सर्वाधिक पाऊस बोधडी मंडळात झाला असून, सर्वात कमी किनवट मंडळात झालेला आहे.