Nanded rain news: फुलवळ परिसरात पावसाचा कहर: हातातोंडाशी आलेली पिके पाण्याखाली, गावठाणांचा संपर्कही तुटला

शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी; प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी
Nanded rain news
Nanded rain newsPudhari Photo
Published on
Updated on

धोंडीबा बोरगावे

फुलवळ: गेल्या दोन दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसाने फुलवळ आणि परिसरातील गावांमध्ये मोठे संकट उभे केले आहे. या पावसाने एकाच वेळी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे आणि गावातील पायाभूत सुविधांचे कंबरडे मोडले आहे.

ऐन तोडणीला आलेले मूग, उडीद, सोयाबीन आणि कापसाची पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, तर दुसरीकडे नदीला आलेल्या पुरामुळे जुने आणि नवीन फुलवळ गावठाणाला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने गावाचा संपर्क वारंवार तुटत आहे.

हातातोंडाशी आलेला घास हिरावला

यावर्षी पेरणीपासूनच विविध संकटांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस 'आस्मानी संकट' ठरला आहे. काढणीला आलेले मुगाचे पीक सततच्या पावसामुळे शेतातच कुजून जात आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.  मूग, उडीद, सोयाबीन आणि कापूस यांसारखी नगदी पिके पूर्णपणे पाण्याखाली आहेत. ढगाळ हवामान आणि सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे पिकांची वाढ खुंटली असून, ती सडण्याचा धोका निर्माण झाला आहे.  फुलवळसह मुंडेवाडी, सोमासवाडी, कंधारेवाडी, केवळातांडा आणि महादेवतांडा या परिसरातील हजारो हेक्टरवरील पिके धोक्यात आली असून, उत्पादनात मोठी घट होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.

जुने-नवे गावठाण पुन्हा एकदा 'संपर्क क्षेत्राच्या बाहेर'

एकीकडे शेतीचे नुकसान होत असताना, दुसरीकडे गावातील दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. फुलवळच्या जुन्या आणि नवीन गावठाणाला जोडणाऱ्या नदीवरील पुलाची उंची अत्यंत कमी आहे. त्यामुळे थोडा पाऊस झाला तरी पुलावरून पाणी वाहू लागते आणि दोन्ही भागांचा संपर्क तुटतो. गेल्या दोन दिवसांपासून ही परिस्थिती वारंवार उद्भवत असल्याने ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

दुहेरी संकटामुळे फुलवळ परिसरातील नागरिक चिंताग्रस्त

या समस्येमुळे दैनंदिन व्यवहार, विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा आणि अत्यावश्यक सेवांवर गंभीर परिणाम होत आहे. "ही समस्या दरवर्षीची आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने पाहून पुलाची उंची वाढवण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून काम सुरू करावे," अशी जोरदार मागणी आता ग्रामस्थांमधून केली जात आहे. या दुहेरी संकटामुळे फुलवळ परिसरातील नागरिक चिंताग्रस्त झाले असून, प्रशासनाने पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी आणि पुलाच्या कामासाठी कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news