

नायगाव : गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बारुळ धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या विसर्गामुळे जुने कुचेली गाव पूर्णपणे पुराच्या पाण्याने वेढले गेले. पुनर्वसन झाल्यानंतरही अनेक कुटुंबे जुन्या कुचेलीत राहत असल्याने त्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले.
काल काही नागरिकांनी वरच्या कुचेलीत आश्रय घेतला होता, मात्र अनेक कुटुंबे पाण्यात अडकून पडली होती. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती गंभीर होत असल्याची माहिती मिळताच आमदार राजेश पवार यांनी प्रशासनाला तातडीने सुचना दिल्या.
आज दुपारी पाण्याची वाढ होत असल्याने प्रशासनाच्या वतीने एनडीआरएफच्या जवानांनी विशेष मोहीम राबवून शंभराहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. यात महिला, मुले, तसेच वयोवृद्ध आजीबाईंचाही समावेश आहे. या बचाव मोहिमेत तहसीलदार धम्मप्रियाताई गायकवाड व त्यांची अधिकारी टीम, एनडीआरएफचे जवान, रामतीर्थ पोलीस ठाण्याचे एपीआय विक्रम हराळे व त्यांची टीम, विजय मोरगुलवार, अवकाश पाटील धुप्पेकर, तुडमे तलाठी साहेब, सरपंच गोविंदराव पा. डाकोरे, पोलिस पाटील राजू पा. व्होनराव, पढरी पा. डाकोरे, गुणवंत पाटील, भुजंग पाटील आदींसह कुचेली येथील नागरिकांचा सहभाग होता.