

Jalkot Taluka communication lost; houses collapsed, water in gram panchayat, schools; appeal for vigilance
जळकोट : बुधवारी रात्री व गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने जळकोट तालुक्यांवर आभाळ फाटले असून मेहनतीने जगवलेल्या पिकांत पाणीच पाणी झाल्याने शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे.
तालुक्यातील जवळपास सर्वच गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक घरे पडली आहेत. ग्राम पंचायतीमध्ये, घरांमध्ये व जिल्हा परिषद शाळांमध्येही पाणी शिरले आहे. अनेक साठवण तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. आज ता. २८ रोजी जळकोट मंडळात ९६, घोणसी मंडळात ९८ तर तालुक्यात एकूण १९४ मिलीमीटर आणि सरासरी ९७ मिलीमीटर एवढा प्रचंड रेकॉर्डब्रेक पाऊस झाला आहे.
डोरसांगवी येथील नदीला पूर या गावाचा संपर्क तुटला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन सरपंच सोक्षा सोनकांबळे, ग्राम पंचायत अधिकारी के. डी. शेवटे व तालुका प्रशासनाने केले आहे. जगळपूर बु. येथील ग्राम पंचायतीत पुराचे पाणी शिरल्याने ग्राम पंचायतीची अभिलेखे भिजली आहेत. दुकान गाळ्यांत पाणी शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले आहे. जगळपूरला जोडणाऱ्या सर्व रस्ते, पुलांवरुन पाणी वाहत असल्याने जगळपूरकरांचे जाणे येणे बंद झाले आहे अशी माहिती ग्राम पंचायत अधिकारी संकेत चट यांनी दिली. तहसीलदार राजेश लांडगे यांनी लाळी (बु.) खुर्द, सोनवळा, बेळसांगवी, लाळी (बु), कोळनूर यांसह विविध गावांना भेटी देत राजेश लांडगे यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली.
पूर परिस्थितीचा आढावा घेतला. डोमगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुराचे पाणी शिरले आहे. गुत्ती येथील हुलाजी व्यंकटराव केंद्रे यांच्या पोल्ट्री फार्म मध्ये पावसाचे पाणी शिरल्याने ६०४ कोंबड्या मरण पावल्याचे नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांनी सांगितले. मंगरुळ येथे अतिवृष्टीने अनेक गोरगरिबांच्या घरात पाणी शिरले आहे संसारोपयोगी साहित्यांचे नुकसान झाले असल्याचे, सरपंच अनुराधा भालेराव, ग्रामपंचायत अधिकारी राजेश मेनकुदळे, सुनील भालेराव यांनी सांगितले. विराळ येथील विठाबाई मारुती सोनवळे, धोंडीबा दत्तात्रय सोनटक्के व अंकुश रामराव सोनटक्के यांच्या घरांच्या भिती कोसळल्या आहेत.
हंडरगुळी (ता. उदगीर) येथील तिरु मध्यम प्रकल्पाचे गेट पूर्ण क्षमतेने उघडले असल्याने प्रकल्पाच्या प्रभावाखालील बेळसांगवी, तिरुका, मरसांगवी, ही गावे येतात त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाटोदा बु येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे जाणारा रस्ता पाण्याखाली बुडाला असून दलित वस्तीत पाणी शिरल्याचे सरपंच सुनील नामवाड यांनी दिली.
शिवाजीनगर तांडा येथील रामराव तुकाराम राठोड यांची जमीन वाहून गेली आहे. तिरु नदी दुथडी भरून वाहत आहे. दिवसभर पाऊस सुरूच असून पावसाचा आणखी जोर वाढल्यास बळकोट उदगीर बिदर राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या पुलावरुन पाणी जाण्याची शक्यता आहे. करंजी सोन-वळा साठवण तलाव (१०० टक्के भरले असून अनेक ठिकाणी नदी नाले, साठवण तलाव, पाझर तलाव भरुन वाहू लागले आहेत. त्यामुळे शेतजमीन व पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.