

नायगाव तालुका : मांजरम गावाच्या पश्चिम दिशेला असलेल्या पाझर तलावाचा पाळू गुरुवारी सायंकाळी फुटल्यामुळे मोठा अनर्थ घडला आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे मांजरम परिसरातील हजारो एकर शेती पाण्याखाली गेली असून गावाकडे पाणी शिरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
या पाण्याचा जोर अतिशय तीव्र असल्याने केवळ शेतीपुरतेच नव्हे तर मुक्या जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच शेतामध्ये वास्तव्य करणाऱ्या शेतकरी व नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या पाण्याचा प्रवाह मांजरमच्या नदी व शिवारातून वाहत जाऊन बेंद्री, खंडगाव, नायगाव मार्गे शेळगाव पुढे कुंटूरकडे सरकत गोदावरी नदीत मिसळणार आहे. त्यामुळे हा धोका केवळ मांजरमपुरता मर्यादित न राहता नायगाव तालुक्यातील बहुतांश गावांवर पुराचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
दरम्यान, या तलावाच्या कामात प्रशासनाने अत्यंत निकृष्ट दर्जाचे व अतांत्रिक पद्धतीने काम केले असल्याचे आरोप स्थानिकांनी केले आहेत. गतवर्षी आमदार राजेश पवार समर्थक एका गुत्तेदाराकडून झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच हा प्रकार घडल्याचे येथील शेतकरी व प्रत्यक्ष दर्शी बोलत आहेत.
प्रशासनाने परिस्थितीची गंभीर दखल घेत एनडीआरएफची यंत्रणा घटनास्थळी रवाना केली असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.पूरस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत असून नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.