

नांदेड : अन्न व औषध प्रशासन, नांदेड कार्यालयाच्यावतीने नशेच्या औषधांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअर्सविरोधात कठोर कारवाई करण्यात आली आहे. यात 32 परवाने निलंबित करण्यात आले आहेत तर 13 परवाने कायम स्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.
नागरिकांना नशेच्या गोळ्यांची बेकायदेशीर विक्री करणारी किंवा नियमबाह्य औषध विक्री करणारी कोणतीही औषधी पेढी आढळून आल्यास त्यांनी सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, नांदेड यांच्याशी संपर्क साधून कार्यालयाकडे लेखी तक्रार सादर करावी. यामुळे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या औषधी दुकानांविरोधात प्रभावी कारवाई करणे प्रशासनास शक्य होईल.
कोटा (राजस्थान)च्या धर्तीवर नांदेड शहर हे शैक्षणिक हब म्हणून विकसित होत आहे. राज्यासह परराज्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी नांदेड येथे वास्तव्यास आहेत. काही मेडिकल स्टोअर्समार्फत नशेच्या औषधांची व गोळ्यांची सहज उपलब्धता होत असल्याबाबत निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने नांदेड शहरासह जिल्ह्यातील विविध भागांतील औषधी दुकानांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.
नांदेड कार्यालयासाठी सहायक आयुक्त (औषधे) यांचे एक पद व औषध निरीक्षकांची एकूण चार पदे मंजूर असून, मार्च 2025 पासून औषध निरीक्षकांची सर्व पदे रिक्त आहेत. सद्यस्थितीत या पदांचा अतिरिक्त कार्यभार सहायक आयुक्त (औषधे), नांदेड यांच्याकडे आहे. तथापि, विभागातील औषध निरीक्षकांच्या सहकार्याने विशेष तपासणी मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली आहे.
या मोहिमेत नोव्हेंबर 2025 अखेर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय नशेच्या गोळ्यांची विक्री तसेच औषध कायद्याच्या इतर तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण 48 औषधी पेढ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्याची माहिती माहिती सहायक आयुक्त औषधे अ.तु.राठोड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.