

नांदेड : नांदेड महानगर पालिका निवडणुकीत भाजपा-शिवसेनेच्या युतीबाबतची पहिली बैठक बुधवारी पार पडली. बैठकीत दोन्ही पक्षांकडील सदस्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्यामुळे निवडणुकीत या पक्षांची युती होणार, असे संकेत मिळाले आहेत.
नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेशी युती करण्याबाबत दोन्ही पक्षांच्या पाच सदस्यीय समितीमार्फत चर्चा होणार असल्याची माहिती खा.अशोकराव चव्हाण यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली होती. त्यानंतर बुधवारी शिवाजीनगरस्थित एका हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली.
भाजपच्यावतीने माजी मंत्री डी.पी.सावंत, चैतन्य बापु देशमुख, दिलीप कंदकुर्ते तर शिवसेनेतर्फे गंगाधर बडूरेे, उमेश मुंडे आणि विनय गिरडे यांनी या बैठकीत सहभाग घेतला. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या बैठकीतून दोन्ही बाजुंनी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे.
बैठकीत झालेल्या चर्चेचा तपशील वरिष्ठांकडे पाठविला जाणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर चर्चेची दुसरी फेरी लवकरच अपेक्षित आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केल्यामुळे मनपा निवडणूक भाजप-शिवसेना एकत्रित लढतील,अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.
भाजपाने शिवसेनेशी युतीबाबत चर्चा सुरु केली असली तरी दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चेचा विषय अद्याप गुलदस्त्यात आहे. प्रदेश पातळीवर सुरु झालेल्या हालचाली लक्षात घेता स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीशी युती होण्याची शक्यता दिसत नाही. युतीबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असल्यामुळे त्यांच्या आदेशानंतरच पुढील निर्णय होईल, असे खा.अशोकराव चव्हाणांनी आधीच स्पष्ट केले आहे.