

विशेष प्रतिनिधी
नांदेड : तब्बल दोन महिने पावसाने दडी मारल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असून हिवाळा सुरू होण्यापूर्वीच अनेक भागातल्या भूगर्भात पाण्याची कमालीची घट झाली आहे. जिल्ह्यातील अनेक हातपंप कोरडे पडले असून बहुतांश छोट्या-मोठ्छा प्रकल्पांनी तळ गाठल्याने नागरिकांसह वन्य प्राण्यांची 'तहान' भागवण्याचे जिल्हा प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
मराठवाड्यातल्या अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत नांदेड जिल्ह्यात दरवर्षी सरासरी इतका किवा त्याहून अधिक पाऊस पडतो. यंदा मात्र पावसाच्या लहरीपणाचा जबर फटका बसला आहे. जुलै-ऑगस्ट महिन्यात झालेल्या किरकोळ पावसानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली; पण दोन महिने पावसाने अखंडित विश्रांती घेतल्याने पावसाळा संपण्यापूर्वीच दुष्काळाची दाहकता प्रकर्षाने जाणवू लागली आहे. डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प तसेच अन्य एक-दोन प्रकल्प वगळता पाण्याचे इतर सध्याची पाणी पातळी सर्व स्रोत आटले आहेत.
जमिनीत पाणी न मुरल्यामुळे तसेच अलीकडच्या काही काळात सिंचनासारख्या महत्त्वूपर्ण व जिव्हाळ्याच्या विषयाकडे दुर्लक्ष झाल्याने भूगर्भातील पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी सिंचनासाठी लोकचळवळ उभी केली होती. शिवाय लाभक्षेत्रात सिंचनाची कामे करण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष बाब म्हणून परवानगी मिळवली होती. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर मात्र या कामाची गती मंदावली ती आजही कायम आहे.
जिल्ह्यात ८२६ हातपंप, ८७० बोअरवेल आहेत त्यातील बहुतांश हातपंप आता शोभेच्या वस्तू बनल्याने खडबडून जागे झालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. पाणी पातळीत झालेली घट उन्हाची तीव्रता, कमी दाबाने होणारा वीजपुरवठा, पाईपलाईनमध्ये झालेला गाळ व कचरा परिणामी काही हातपंप नादुरूस्त झाल्याचे लक्षात आल्यानंतर आता त्याच्या दुरुस्तीसाठी हालचाली सुरू झाल्याचे सांगण्यात आले.
वेगवेगळ्या १६ तालुक्यांतील ३८४६ ठिकाणी जलसंधारणाची कामे घेण्यात आली आहेत. पाण्याचे स्रोत बळकट करण्यासाठी ३४६ विहीर पुर्नभरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. जलसंधारणाची सुरू असलेली कामे दर्जेदार झाली, तर भविष्यातील पाणीटंचाई कमी होईल असा विश्वास प्रशासनाला आहे. एल-निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने दडी मारली आहे. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली, तर पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचा उपयोग भूजल पातळी वाढविण्यासाठी होणार आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना सुरू असल्या, तरी अनेक ठिकाणी अवैध उपसा करून सफाईदारपणे पाणी चोरल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. शिवाय ५०० ते ६०० फुटापर्यंत बोअर करून भूगर्भाची चाळणी केली जात आहे. ऐन हिवाळ्यात अनेकांचे बोअर आटले, असले, तरी ज्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा पर्याय यापूर्वीच निवडला त्यांच्यासाठी ही योजना संजीवनी ठरली आहे. जिल्ह्यातल्या अर्धापूर, नांदेड, लोहा, देगलूर, नायगाव या तालुक्यातील पाणी पातळी सर्वाधिक घटली असल्याचे सांगण्यात आले.
नांदेड जिल्ह्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक असते. उन्हाळ्यातही अनेक छोट्या-मोठ्या प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असतो. यंदा मात्र चिंताजनक परिस्थिती आहे. शहर व परिसरात उभ्या राहणाऱ्या टोलेजंग इमारती, अवैध वृक्षतोड, पाण्याचा अपव्यय यांचे दुष्परिणाम आता सोसावे लागत आहेत. भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी जलसंधारणाची लोकचळवळ उभी राहणे आवश्यक आहे.
- योगेश पांडे, नागरिक, वामननगर नांदेड