

Nanded District Central Cooperative Bank news
विशेष प्रतिनिधी
नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील हरिहरराव भोसीकर यांच्या रिक्त जागी त्यांचे ज्येष्ठ पुत्र शिवकुमार भोसीकर यांची वर्णी लागण्याची शक्यता असून संचालकपदासाठी त्यांच्याकडे पात्रता असल्याचे सांगण्यात आले. बँकेतील संचालकपदाची तसेच उपाध्यक्षांची जागा भरण्यासंदर्भात सहकार खात्याच्या निवडणूक प्राधिकरणाकडून बैठकीची तारीख अद्याप कळविण्यात आलेली नाही.
हरिहरराव भोसीकर यांचे दीर्घ आजारानंतर गेल्या महिन्याच्या २७ तारखेला निधन झाल्यामुळे बँकेत संचालकपदासह उपाध्यक्षपदही रिक्त झाले. भोसीकर हे इतर मागासवर्गीय मतदारसंघातून बँकेवर निवडून आले होते. नंतर त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. बँकेतील संचालकपद रिक्त झाल्यानंतर त्यासाठी पूर्ण निवडणूक प्रक्रिया न करता संचालक मंडळातूनच पात्र उमेदवाराची निवड केली जाते. यापूर्वी माजी खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी त्यांचे पुत्र प्रा. रवींद्र चव्हाण यांची संचालकपदी निवड झाली होती.
भोसीकर निधनामुळे यांच्या बँकेमध्ये एकाचवेळी दोन जागा रिक्त झाल्या. याबाबतची माहिती सहनिबंधकांना या महिन्याच्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकमी बँक प्रशासनाने लातूरच्या विभागीय आरंभीच पाठविली होती. त्यानंतर सहनिबंधकांनी नांदेड जिल्हा बँकेतील या रिक्त जागांसंदर्भात निवडणूक प्राधिकरणाला अधिकृतपणे सर्व माहिती पाठविली.
आता सर्व संबंधितांना प्राधिकरणाच्या पुढील सूचनेची प्रतीक्षा असल्याचे सांगण्यात आले. बँकेच्या उपाध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षाचे एक संचालक इच्छुक असल्याचे आतापर्यंतच्या घडामोडींतून समोर आले. या पार्श्वभूमीवर चौकशी केली असता संचालकपदाची रिक्त जागा भरणे तसेच नव्या उपाध्यक्षाची निवड करणे या दोन्ही प्रक्रिया स्वतंत्रपणे कराव्या लागणार असल्याचे सांगण्यात आले.
विद्यमान संचालक मंडळाचे जेमतेम आठ महिने शिल्लक राहिले आहेत. या अल्पकालावधीसाठी उपाध्यक्षपदी कोणाची निवड होते, ते लवकरच स्पष्ट होईल; पण भोसीकर यांच्या संचालकपदाच्या रिक्त जागेसाठी त्यांचे पुत्र शिवकुमार यांचे नाव समोर आले आहे.
त्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची जुळवाजुळव केली असून रवींद्र चव्हाण यांच्या धर्तीवरच त्यांनी संचालक मंडळात सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे; पण आधी संचालकाची रिक्त जागा भरणार का, उपाध्यक्षाची हे प्राधिकरणाच्या अधिसूचनेवर अवलंबून असल्याचे बँक प्रशासनातून सांगण्यात आले. पुढील आठवड्यात प्राधिकरणाकडून सूचना किंवा आदेश आले, तर जुलै महिन्यात दोन्ही रिक्त जागा भरल्या जाऊ शकतात, असे बँक प्रशासनाचे म्हणणे आहे.