

Demand to start bus service for students of Saregaon (Tal. Mudkhed)
बारड, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात सोळा जून रोजी शाळेच्या घंटा वाजायला लागल्या आणि गावात किलबिल करणाऱ्या मुला मुलींचे धवे पुन्हा शाळेच्या दिशेने झेप घ्यायला लागली. सरेगाव (ता. मुदखेड) येथील विद्यार्थी- विद्यार्थिनी शिक्षणासाठी बारड येथील जिल्हा परिषद व इतर खाजगी संस्थेत शिक्षणासाठी येत असतात.
परंतु या गावात परिवहन महामंडळाची थेट 'बससेवा' उपलब्ध नसल्याने विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची शालेय शिक्षणाच्या प्रवासासाठी मोठी ससेहोलपट होत असते आणि त्यांना जवळपास एक किलोमीटर पायपीट करावी लागते. त्यामुळे साहेब, आम्हाला शालेय शिक्षणासाठी थेट गावात 'बससेवा' सुरू करावी, अशी आर्त हाक सरेगाव येथील विद्यार्थिनींनी दिली आहे.
आज जग एकविसाव्या शतकात पोहोचले असताना भोकर मतदारसंघातील विविध गावात आजही पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. गावात माध्यमिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने 'सरेगाव' येथील शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बारड येथील जिल्हा परिषद व खाजगी शाळेत शिक्षणासाठी येत असतात. मुदखेड -निवघा, जवळा आणि बारड जाणारी बस सरेगाव मध्ये जात नाही. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना जवळपास एक किलोमीटर पायपीट करावी लागते. परिवहन महामंडळाची संबंधित क्स सरेगावात आल्यास तेथील शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची ससेहोलपट थांबणार आहे.
'सरेगाव' येथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची होणारी ससेहोलपट बघता प्रा. संदीपकुमार देशमुख बारडकर यांनी विभाग नियंत्रक 'चंद्रकांत वडजकर' यांना संपर्क करून थेट गावात बस सेवा सुरू करावी, अशी विनंती केली आहे. तसेच त्यांना लेखी पत्रव्यवहार करूनही कळवले आहे.