

Nanded District Central Cooperative Bank Directorship Shivkumar Bhosikar Selection
विशेष प्रतिनिधी
नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील संचालकपदाच्या रिक्त जागेवर दिवंगत हरिहरराव भोसीकर यांचे पुत्र शिवकुमार यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. बँकेतील ज्येष्ठ संचालकांचा त्यांच्या नावाला पाठिंबा होताच. तसेच खा. अशोक चव्हाण यांनीही त्यांच्या नावाला मान्यता दिल्यामुळे निवडणुकीचा प्रसंग टळला.
हरिहर भोसीकर यांच्या निधनामुळे बँकेत इतर मागासवर्ग मतदारसंघाचे संचालकपद तसेच उपाध्यक्षपदही रिक्त झाले होते. वरील दोन्ही पदे भरण्याचा प्रस्ताव राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला, त्यानुसार सोमवारी संचालकपद भरले गेले तर उपाध्यक्ष निवडीसाठी मंगळवारी संचालक मंडळाची स्वतंत्र सभा होणार आहे.
जिल्हा उप निबंधकांनी निवडीची प्रक्रिया पार पाडली, बँकेमध्ये काही महिन्यांपूर्वी दिवंगत बसंतराव सरहाण यांच्या जागी त्यांचे पुत्र खा. रम्येंद्र चव्हाण यांना संचालक मंडळावर घेण्यात आले. शिवकुमार भोसीकर यांच्या बाबतीत तीच भूमिका घेण्यात आली. त्यांनी संचालकपदासाठी दोन अर्ज दाखल फेले होते. निर्धारित मुदतीत अन्य कोणाचाही अर्ज आला नाही. त्यामुळे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी पुढील प्रक्रिया झटपट पूर्ण करून भोसीकर यांची संचालकपदी निवड झाल्याचे जाहीर केले.
बँकचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह बहुसंख्य संचालक बरील बैठकीस उपस्थित होते. भोसीकर यांची बिनविरोध निवड जाहीर झाल्यानंतर संचालक मंडळातील सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. हरिहर भोसीकर हे दीर्घकाळ बँकेच्या संचालक मंडळात सक्रिय राहिले. त्यांचे बँकेतील पद रिक्त झाल्यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र म्हणून शिवकुमार यांना संचालक पदासाठी कुटुंबाकडून पुढे करण्यात आले. तत्पूर्वी त्यांनी सर्व ज्येष्ठ नेते आणि संचालकांची भेट घेऊन सहकार्याची विनंती केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनीही शिवकुमार यांच्या नावाला मान्यता दिली होती.
बँकेच्या विद्यमान संचालक मंडळात सध्या कुठल्याही एका गटाकडे बहुमत नाही. या पार्श्वभूमीवर उपाध्यक्षपदाची रिक्त जागा भरण्यासाठी मंगळवारी सभा होणार आहे. या पदासाठी माजी आमदार व संचालक हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी मागील महिनाभरापासून प्रयत्न चालविले आहेत. तिन्ही गटांच्या प्रमुखांची भेट घेऊन त्यांनी आपला मनोदय त्यांच्या कानी घातला. एकंदर परिस्थितीमुळे बेटमोगरेकर यांच्या नावावर एकमत झाले असल्याचे सांगण्यात आले.