

Dharmabad Gram Panchayat Sarpanch Reservation
धर्माबाद : आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धर्माबाद तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत मंगळवारी (दि. २२) नगरपालिका सभागृहात पार पडली. सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी झालेल्या या सोडतीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिला तसेच सर्वसाधारण पदांसाठी ग्रामपंचायती निश्चित करण्यात आल्या. आरक्षण जाहीर होताच अनेक गावांतील इच्छुकांच्या राजकीय गणितांना कलाटणी मिळाली असून, गावपातळीवरील मोर्चेबांधणीला आता वेग येण्याची शक्यता आहे.
अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी मंगनाळी, येताळा, करखेली, सिरजखोड आणि पाटोदा खु. या ग्रामपंचायतींची निवड झाली. अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गात मनूर, बाचेगाव, विळेगाव (ध.) आणि पाटोदा (थडी) यांचा समावेश आहे.
अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आटाळा, सालेगाव, बाभुळगाव आणि चोळाखा, तर अनुसूचित जमाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी धानोरा (खु.), बैलूर (खु.) आणि चोंडी या ग्रामपंचायती निश्चित झाल्या.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षणात बेलगुजरी/हारेगाव, चिंचोली आणि दिग्रस या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारणसाठी जारीकोट, येल्लापूर आणि बामणी (ध.) या ग्रामपंचायतींची निवड झाली.
सर्वसाधारण (खुला) महिला प्रवर्गात येवती, कारेगाव, माष्टी, राजापूर, मोकळी/क-हाळ, विळेगाव (थडी), नायगाव (ध.), समराळा, हसनाळी, पिंपळगाव (ध.), संगम आणि पांगरी या १२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
तर सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी सायखेड, बेल्लूर (बु.), आलूर/नेरळी, जुन्नी, चिकना, बन्नाळी, शेळगाव (थडी), रोशनगाव, अतकूर, बामणी (थडी) आणि पाटोदा (बु.) या ११ ग्रामपंचायती निश्चित करण्यात आल्या.
सरपंचपदाचे आरक्षण स्पष्ट झाल्याने गावागावातील राजकीय हालचालींना आता वेग येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून सरपंचपदासाठी तयारी करणाऱ्या इच्छुकांना आरक्षणानुसार आपली रणनीती बदलावी लागणार आहे. काही गावांतील विद्यमान राजकीय गटांना नव्याने उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार असून, महिला आरक्षणामुळे अनेक कुटुंबांतील महिला इच्छुकांच्या नावांची चर्चाही सुरू होण्याची शक्यता आहे.
आरक्षण सोडतीनंतर संभाव्य उमेदवारांची चाचपणी, गटबांधणी आणि समर्थकांची जुळवाजुळव याला वेग येणार आहे. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावपातळीवरील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
अनुसूचित जाती महिला – ५
अनुसूचित जाती सर्वसाधारण – ४
अनुसूचित जमाती महिला – ४
अनुसूचित जमाती सर्वसाधारण – ३
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला – ३
नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण – ३
खुला महिला – १२
खुला सर्वसाधारण – ११
एकूण – ४५ ग्रामपंचायती