

Umri Rasta Roko Bullock Cart Protest
उमरी : उमरी तालुक्यातील धानोरा मंडळातील सुमारे १८ गावांतील शेतकऱ्यांना पीकविमा न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी मंगळवारी उमरी शहरातील मामा चौकात बैलगाड्यांसह रास्ता रोको आंदोलन केले. माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकरराव देशमुख धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे उमरी-भोकर, उमरी-मुदखेड आणि उमरी-धर्माबाद मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास पूर्णपणे ठप्प झाली.
पीकविमा मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी बैलगाड्यांसह रस्त्यावर ठिय्या मांडला. त्यामुळे बस, खासगी वाहने आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. भर उन्हात महिला, लहान मुले आणि नागरिकांना रस्त्यावरच थांबावे लागले.
आंदोलनाची माहिती मिळताच कृषी विभाग, महसूल विभाग, पीकविमा कंपनी आणि पोलिस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी ३० जूनपर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविमा जमा न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मंगळवारी सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या आंदोलनात धानोरा मंडळातील विविध गावांतील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महिलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. मृग नक्षत्र जवळ आले असून पेरणीसाठी बियाणे, खते आणि इतर शेतीकामांसाठी निधीची आवश्यकता असताना पीकविमा मिळाला नसल्याने शेतकरी अडचणीत आल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
यावेळी सुधाकरराव देशमुख धानोरकर, उपनगराध्यक्ष कैलास देशमुख गोरठेकर, दिगंबर जगताप, दिलीप पाटील सावंत आदींनी मनोगत व्यक्त करत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. दत्तराव देशमुख, राजू पाटील, गणेशराव आनेमवाड, उद्धव मामडे, आकाश सैदमवार, विठ्ठल नारलेवाड, वर्षा जाधव, वसंत जाधव, बालाजी सूर्यवंशी, नागेश बट्टेवार यांच्यासह धानोरा, बोळसा, तुराटी, बोथी, मंडाळा, रामखडक, हुंडा, सावरगाव आदी गावांतील शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
आंदोलनस्थळी पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे, डीएसबीचे कोलबुद्धे, पोलीस उपनिरीक्षक सचिन आरमाळ, महसूल विभागाचे संजय सोलंकर, तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे तसेच पीकविमा कंपनीचे अधिकारी दीपक मस्के उपस्थित होते.
तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे यांनी सांगितले की, धानोरा मंडळातील एका पीक कापणी प्रयोगाबाबत विमा कंपनीने आक्षेप नोंदविला होता. या आक्षेपाची दखल घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत संबंधित बाबींची तपासणी करून आक्षेपाचे निराकरण करण्यात आले असून सुधारित अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
सध्या विमा कंपनीकडून कोणताही आक्षेप प्रलंबित नसून धानोरा (बु.) मंडळ पीकविम्यासाठी पात्र ठरले आहे. विमा पोर्टलवर नुकसान भरपाई निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध निधीनुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.