Nanded Crime News : प्रशासकीय इमारतीच्या आवारात एकाने जीवन संपवले

लोहा येथील घटना : ६ ते ७ पानांची सुसाईड नोट जप्त, चिठ्ठीत अनेकांची नावे
प्रशासकीय इमारतीच्या आवारात एकाने जीवन संपवले
प्रशासकीय इमारतीच्या आवारात एकाने जीवन संपवले file photo
Published on
Updated on

Nanded Crime News: Man Ends Life on Administrative Building Premises

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : येथील तहसील कार्यालय, पंचायत समिती, रजिस्ट्री व भूमी अभिलेख कार्यालयांच्या मुख्य प्रशासकीय परिसरात सोमवारी (१ जून) पहाटे एका ४२ वर्षीय इसमाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मारोती पुंडलीक बाचेवाड (वय ४२, रा. निळा) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे लोहा शहरासह परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मृताच्या खिशात तब्बल ६ ते ७ पानांची सुसाईड नोट आढळून आली असून, त्यात गावातील काही व्यक्तींसह तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे.

प्रशासकीय इमारतीच्या आवारात एकाने जीवन संपवले
Ambajogai News : स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे भूलतज्ज्ञ डॉ. अभिमन्यू तरकसे यांचा तलावात बुडून मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास प्रशासकीय कार्यालय परिसरात कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी श्रीरामे यांना लिंबाच्या झाडाला एका व्यक्तीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती तहसीलदार विठ्ठल परळीकर व लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांना दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, तलाठी भूमेश्वर विभुते, महसूल सेवक माधव काकडे यांच्यासह पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. मृत मारोती बाचेवाड यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या उपस्थितीत झाडावरून खाली उतरवून लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. लोहा पोलीस ठाण्यात सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रशासकीय इमारतीच्या आवारात एकाने जीवन संपवले
Beed Crime News | सावत्र मुलासोबत घरातून पळून गेलेल्या महिलेचा दुर्दैवी अंत; तरुणाच्या मृत्यूच्या 24 तासांच्या आतच महिलेने उचलले टोकाचे पाऊल

खिशात मिळाली सुसाईड नोट

पोलीस तपासादरम्यान मृत मारोती बाचेवाड यांच्या खिशात ६ ते ७ पानांची सविस्तर सुसाईड नोट आढळून आली आहे. या चिठ्ठीत निळा गावातील काही व्यक्तींसह तालुका पातळीवरील काही शासकीय अधिकाऱ्यांची नावे लिहिलेली आहेत. "नळ कनेक्शन कट करण्याच्या कारणावरून मला प्रचंड त्रास देण्यात आला," असा खळबळजनक उल्लेख या चिठ्ठीत मृत बाचेवाड यांनी केला असल्याचे समजते.

तपासाचे आव्हान

प्रशासकीय इमारतीच्या आवारातच ही आत्महत्या झाल्याने आणि सुसाईड नोटमध्ये थेट शासकीय अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख असल्याने तालुक्यात तर्क-वितर्वांना उधाण आले आहे. नळ कनेक्शन कट करण्याच्या साध्या कारणावरून मारोती बाचेवाड यांना नक्की कोणी आणि कसा त्रास दिला? याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली लोहा पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

मृताच्या खिशात सुसाईड नोट सापडली आहे ही वस्तूस्थिती आहे. मात्र, या चिठ्ठीतील अंतर्गत विषय आणि नेमका संदर्भ लागत नाहीये. तसेच या प्रकरणी बाचेवाड यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही.
नागनाथ आयलाने, पोलीस निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news