Nanded Crime | ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास ५ वर्षे सश्रम कारावास
Deglur child abuse case
बिलोली: तीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ वर्षे सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. गणेश होटलप्पा ऊर्फ प्रभाकर पडमपल्ले (वय २०, रा. आलूर, ता. देगलूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
घटनेची पार्श्वभूमी
ही घटना १३ जून २०२४ रोजी दुपारी १२ च्या सुमारास देगलूर तालुक्यातील आलूर येथे घडली होती. पीडित मुलगी आपल्या घराबाहेर खेळत असताना, "तुझे पप्पा गोठ्यात आहेत" असे आमिष दाखवून आरोपीने तिला जवळच असलेल्या जनावरांच्या गोठ्यात नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयाचा निकाल
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एम. शिंगाडे यांनी करून बिलोली न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले.
जिल्हा तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश वि. ब. बोहरा यांनी पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी धरले. न्यायालयाने खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली:
शिक्षा: ५ वर्षे सश्रम कारावास
दंड: २० हजार रुपये (दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महिने सश्रम कारावास)
नुकसान भरपाई: दंडाची रक्कम पीडितेस नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत.
सरकारी पक्षाची बाजू
या प्रकरणात सहाय्यक सरकारी अभियोक्ता संदीप भीमराव कुंडलवाडीकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. जयेश संदीप अग्रवाल, ॲड. योगेश सतीश पुंड आणि पैरवी कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल सी. बी. पांढरे यांनी सहकार्य केले.

