

नांदेड ः जिल्ह्यात सिकलसेल आजाराचे प्रमाण लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यामध्ये तपासणी मोहीम राबविली होती. यामध्ये 2011 पासून आजपर्यंत 3 लाख 4 हजार 416 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 191 सिकलसेल रुग्ण आणि 1 हजार 462 सिकलसेल वाहक आढळून आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी दिली.
सिकलसेल नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात आदिवासी व दुर्गम भागात प्रभावीपणे अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांमध्ये जनजागृती, मोफत सोल्युबिलिटी चाचणी, इलेक्ट्रोफोरेसिस व एच.पी.एल.सी. तपासणी, रुग्णांना मोफत औषधे, समुपदेशन, नियमित आरोग्य तपासणी, गरजेनुसार रक्त संक्रमण, टेलिमेडिसीनद्वारे तज्ज्ञांचा सल्ला आदी सुविधा पुरविण्यात येत आहेत.
डॉ. संगीता देशमुख यांनी सांगितले की, सिकलसेल हा अनुवंशिक आजार असून तो आई-वडिलांकडून अपत्यांमध्ये येतो. त्यामुळे विवाहपूर्व सिकलसेल तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. वाहक-वाहक किंवा वाहक-रुग्ण विवाह टाळल्यास सिकलसेल आजाराचा प्रसार रोखणे शक्य आहे. सिकलसेलग्रस्त मातांनी गर्भधारणेनंतर लवकर गर्भजल तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
काळजी घेतल्यास आजार नियंत्रणात
सिकलसेल रुग्णांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत 2 हजार 500 रुपये आर्थिक सहाय्य, 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत अतिरिक्त वेळ, तसेच उपचारासाठी बस प्रवासात सवलत देण्यात येते. सिकलसेल आजारावर पूर्ण उपचार नसला तरी योग्य औषधोपचार, नियमित तपासणी, समतोल आहार व काळजी घेतल्यास आजार नियंत्रणात ठेवता येतो, असेही डॉ. संगीता देशमुख यांनी सांगितले आहे.