

नांदेड : शहरातील देगावचाळ भागातील गणेश मंडळाजवळील वादाचा राग मनात धरून एका तरुणावर खंजर, तलवार आणि दगडाने प्राणघातक हल्ला करणाऱ्या सात आरोपींना वजिराबाद पोलिसांनी तत्परतेने अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोज प्रल्हाद माने (वय ३२, रा. सोमेश कॉलनी) व जखमी शंकर माने हे २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी दुचाकीवरून साहित्य आणण्यासाठी जात होते. देगांवचाळ येथील हार्डवेअर दुकानासमोर आरोपींनी त्यांना अडवले. "गणेश मंडळाजवळ जास्त बोलत होतास, तुला आता संपवूनच टाकतो," असे म्हणत आरोपींनी शंकर माने यांच्यावर खंजर व तलवारीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार फरार आरोपींच्या शोधासाठी राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत, वजिराबाद गुन्हे शोध पथकाने २४ सप्टेंबर रोजी सर्व सातही आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी:
रोहित उर्फ सोनू रमेश गोडबोले (वय २५, रा. देगांवचाळ),जब्बा उर्फ आदित्य दयानंद हटकर (वय १९),रोहन माधव नवघडे (वय २३),अजय गौतम थोरात (वय २५), सुजल गणपत बहादुरे (वय १९),अभिजीत भागेंद्र नरवाडे (वय २६, ), कुणाल रमेश नवरे (वय १९) हे सर्व राहणार देगावचाळ , नांदेड.
तपासासाठी आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (कोर्ट क्र. ४) यांच्यासमोर हजर केले असता, न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेऊन आरोपींना . या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लोंढे करत आहेत.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजंने यांच्या मार्गदर्शनाखाली वजिराबादचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार, सपोनि प्रशांत लोंढे, पोउपनि सुनील बुलंगे आणि गुन्हे शोध पथकातील अंमलदार शिवासांव मठपती, विलास कदम, ज्वालासिंघ बावरी, संतोष पोकळे, संतोष पावडे, भाऊसाहेब राठोड, इम्रान पठाण व किशोर जयस्वाल यांच्या पथकाने केली.