

नांदेड : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या तिन्ही आयुक्तांनी संयुक्तरीत्या जारी केलेल्या निवेदनामुळे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांच्या सहकार्यांनी उभा केलेला ‘फेक नॅरेटिव्ह’ पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. एसआयआरसह सर्व प्रक्रिया एकमताने झाल्या असून, कोणताही ‘डिफरन्स ऑफ ओपिनियन’ नसल्याचे तिन्ही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. तिन्ही निवडणूक आयुक्तांमध्ये मतभेद असल्याचे भासवले जात होते. मात्र, या तिघांनाही संयुक्तपणे जारी केलेल्या निवेदनामुळे तो प्रयत्न फोल ठरल्याचे मत माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.
खा.अशोक चव्हाण यांनी सोमवारी वार्ताहर बैठकीत बोलताना राहुल गांधींसह अन्य विरोधी पक्षांवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, राहुल गांधी हातात संविधानाचे पुस्तक घेऊन संवैधानिक संस्थांवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. ते संविधानाचा आधार घेत असल्याचा दावा करतात. मात्र, त्याच संविधानाने निर्माण केलेली लोकशाही व्यवस्था आणि संवैधानिक संस्था त्यांना मान्य आहेत का? हा प्रश्न जनतेसमोर निर्माण झाला आहे.
कॅबिनेट सेक्रेटरींकडे गेलेले पत्र कोणत्याही धोरणात्मक विषयाशी संबंधित नव्हते. ते पत्र डेप्युटेशनवरील नियुक्तीशी संबंधित होते. मात्र या पत्राला वेगळे स्वरूप देऊन निवडणूक आयोगामध्ये मतभेद असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.फॉर्म क्रमांक ६ च्या संदर्भातही जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने ज्या फॉरमॅटमध्ये फॉर्म क्रमांक 6 वैध ठरवला आहे, त्याच फॉरमॅटमध्ये तो वापरण्यात येत आहे. त्यामुळे या मुद्यांवरून संभ्रम निर्माण करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबतही जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
निवडणुकीत विजय मिळाला की निवडणूक आयोग योग्य आणि पराभव झाला की निवडणूक आयोगावर आरोप, अशी दुटप्पी भूमिका काँग्रेसने सोडली पाहिजे. तेलंगणा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकात विजय मिळाल्यानंतर हाच निवडणूक आयोग योग्य होता; मग भाजप विजयी झाल्यानंतरच आयोगावर प्रश्न का उपस्थित केले जातात? ईव्हीएमबाबतही सातत्याने आरोप करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमच्या संदर्भात निर्णय दिलेला आहे.
निवडणूक आयोगाने ईव्हीएम हॅक करण्याचे आव्हानही दिले होते. ते आव्हान सिद्ध करण्यास कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे आता ईव्हीएमचा मुद्दा बाजूला ठेवून निवडणूक आयोयावेळी भाजपाचे नांदेड महानगरचे अध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आ.डॉ. तुषार राठोड, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष चैतन्यबापू देशमुख, महापौर सौ. कविताताई मुळे, भाजपाचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख, नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, डॉ. सचिन उमरेकर, जिल्हा प्रवक्ते नीलेश देशमुख बारडकर उपस्थित होते.
दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये मुखेड तालुक्याचा समावेश ट्रिगर-१ मध्ये झालेला नाही. जून-जुलैमध्ये तालुक्यात पावसाची सरासरी चांगली होती. परंतु त्यानंतर २८ दिवसांचा खंड पडल्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आता ट्रिगर-२ किंवा ट्रिगर-३ मध्ये मुखेड तालुक्याचा समावेश करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती यावेळी आ. तुषार राठोड यांनी सांगितले.