

नांदेड : नांदेड जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. तब्बल 19 गंभीर गुन्ह्यांत पोलिसांना हवा असलेला (वॉन्टेड) आणि पोलिसांना गुंगारा देणारा सराईत गुन्हेगार अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या (जाळ्यात अडकला. या कारवाईत पोलिसांनी त्याच्याकडून सव्वा दोन लाख रुपये किमतीच्या 7 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. शेख सोहेल उर्फ शेख शौकत (वय 21) असे अटक करण्यात आलेल्या अट्टल चोरट्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कडक कारवाईचे आदेश दिले होते. दरम्यान, 19 गुन्ह्यांत फरार असलेला आरोपी शेख सोहेल हा किनवट तालुक्यातील चिखली येथे असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे यांच्या फिर्यादीवरून किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीचा पर्दाफाश?
त्याच्याकडून चोरीच्या 7 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, त्याने केवळ नांदेडच नव्हे, तर यवतमाळ, चंद्रपूर आणि शेजारच्या तेलंगणातील आदिलाबाद या जिल्ह्यांतही हातसफाई केल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्या अटकेमुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.